तणावातही बांगलादेशची भारताकडून तांदूळ खरेदी
27 हजार टन साठा चितगावमध्ये दाखल : भविष्यातील संकट टाळण्यासाठी सावधगिरी
वृत्तसंस्था/ ढाका
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढत असतानाही व्यापार सुरूच आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतातून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशने भारताकडून 2 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 27 हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.
बांगलादेशात सध्या तांदळाची कमतरता नाही. मात्र, नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी सरकारने तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतातून 2 लाख टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची व्यापारी बोलणी आणि व्यवहार यापूर्वीच पूर्ण झाला असल्याने आता तांदूळ साठा पाठविला जात आहे.
भाव स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने तांदळाच्या आयातीवरील सर्व शुल्क हटवले आहे. भारतातून खासगी स्तरावर शून्य आयात शुल्कासह मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात केला जातो. भारतानेही बांगलादेशच्या नव्या सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे काम करत असल्याचे बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यांनी अलिकडेच सांगितले होते.
‘जीटूजी’ स्तरावर अधिक तांदूळ आयातीची योजना
मुख्य निविदेव्यतिरिक्त सरकार ते सरकार (जीटूजी) स्तरावर भारतातून अधिक तांदूळ आयात करण्याची योजना बांगलादेश आखत आहे. याशिवाय बांगलादेश सरकारकडून भारतातील खासगी निर्यातदारांकडून आतापर्यंत 16 लाख टन तांदूळ आयात करण्याची परवानगी घेण्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त म्यानमारकडूनही 1 लाख टन तांदूळ आयात करण्यासाठी ‘जीटूजी’ करारही केला आहे. यासोबतच व्हिएतनाम आणि पाकिस्तानशीही याबाबत चर्चा सुरू असल्याचे बांगलादेशच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले.
हिंदूंना टार्गेट केल्यामुळे तणाव
अलिकडच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधात तणाव खूप वाढला आहे. शेख हसीना यांना पदच्युत केल्यापासून हिंदू नेते आणि धार्मिक स्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. याशिवाय भारताबाबतही अनेक प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. हिंदू धर्मगुरू चिन्मय प्रभू 25 नोव्हेंबरपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. दोन्ही देशांनी याबाबत जोरदार वक्तव्येही केली आहेत. एकीकडे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न बांगलादेशकडून सुरू असला तरी द्विपक्षीय व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत.