'संगमेश्वर-ओणी' मार्गाला संभाजीराजांचे नाव द्या
शिराळा :
शिराळा तालुक्यातून जाणारा संगमेश्वर, नायरी, विठा ते ओणी या मार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी आ.सत्यजित देशमुख यांनी अर्थसंकल्पीय विधिमंडळात केली.
यावेळी आ. देशमुख म्हणाले, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मेणी खोरा, सोनवडे, खोतवाडी, बेरडेवाडी, गुढे, पाचगणी पठार, मणदूर, धनगरवाडा, खुंदलापूर, सांवतवाडी, शिरसाटवाडी येथे मोबाईलला पुरेसे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी वेगळा विचार करून शेतकऱ्यांना ऑफलाईन ई पिक पाहणी करण्याची सुविधा द्यावी. त्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना भेटून ई पिक नोंदणी करावी किंवा गुगल नकाशाचा वापर करून त्यांची नोंदणी करावी.
मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून १० लाख युवकांना प्रशिक्षित केले जात आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचे एक उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील सुरु करावे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर वेळेत जमा करावी. ६५ वर्षावरील अनेक जेष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी त्यांचे उत्तर दायित्व शासनाने घ्यावे. विविध सणासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्लस्टर ऑफ प्यारिसच्या (पी.ओ.पी) च्या मूर्तीसाठी कलाकारांना त्यांच्या अपेक्षे प्रमाणे काम करण्याची मुभा द्यावी.
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने शेतीसाठी उंच ठिकाणी व दूरवरून पाण्याची पाईप लाईन करावी लागते. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांना १० एच.पी.ची विद्युत मोटार घ्यावी लागते. त्यामुळे ७.५ एच.पी.पर्यंत केलेली वीज बील माफी १० एच.पी.पर्यत द्यावी. सरकारने दुर्ग संवर्धन मोहीम हाती घ्यावी. मुख्यमंत्री कौशल्य योजनेला सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी, अशा विविध मागण्या विधी मंडळात आ. सत्यजित देशमुख यांनी मांडल्या.
- विधिमंडळात केलेल्या मागण्या ...
संगमेश्वर, नायरी, विठा, ओणी मार्गास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे.
ई पिक पाहणी शेतकऱ्यांना ऑफलाईन करण्याची मुभा द्यावी. त्यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी यांची नेमणूक करावी
रतन टाटा कौशल विकास विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली येथे स्थापन करावे.
शालेय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी.
शेतकऱ्यांना सात एच.पी प्रमाणे दहा एच. पी पर्यंतच्या विद्युत मोटारींना मोफत वीज द्यावी.