For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाकी आले नऊ !

06:17 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
नाकी आले नऊ
Advertisement

भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्या महायुतीत जागावाटपाचा तिढा इतका जटील बनत चालला आहे की, खुद्द एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंत्या आणि इशारे देऊनच नाकी नऊ आले आहेत. योगायोगाने सहा ठिकाणी डोळे वटारणेसुध्दा कामी आल्यामुळे दुखावलेले नेते नऊ मतदार संघाचे तिढे आता सुटू लागतील असे सांगू लागले आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे येऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात बंडखोरी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो त्यावेळी अपयशी ठरला. हे माहीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जंग जंग पछाडले आणि अखेर आवाडे यांना बंडापासून परावृत्त केले. आपल्या सोबत हाताला धरूनच धैर्यशील माने यांचा अर्ज भरायला मुख्यमंत्री त्यांना घेऊन गेले. अर्थात राज्याच्या प्रमुखावर इतक्या टोकाचे प्रयत्न करायची वेळ यावी हे विशेषच. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती किमया साधली. याबद्दल त्यांचे कौतुक. पण अशाने सगळीकडची बंडखोरी शमते असे होत नाही. मूळ प्रश्न न सोडवता अशा प्रकारचा दिखावा फारसा उपयुक्त ठरत नाही. नेते व्यासपीठावर असले तरी कार्यकर्ते आपले गुण दाखवतच असतात. त्याचे परिणाम निकालानंतर दिसतात. अशा परिणामांची भीती सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना लागली आहे. पण, सत्ताधारी पक्ष इतका तगडा बनलेला असताना त्यांच्यातील मतभेद मिटता मिटेनात. पूर्वी जबाबदारी न घेणारे नेते आता तिकिटासाठी हट्ट करत आहेत तर प्रत्येकाला आपल्या शक्तीची वृध्दी झाल्याचा भास होत आहे. परिणामी खरोखरच ज्यांची शक्ती वाढली आहे त्यांना त्याचे प्रदर्शन करणे डोकेदुखीच ठरत आहे. विनाकारण बेटकुळ्या फुगवून दाखवणारे नेते आणि त्यांच्या समर्थनार्थ रचल्या जाणाऱ्या खेळ्या यामुळे राजकारणी हैराण झाले आहेत. निर्णयक्षमता कोणाही एकाच्या हातात राहिली नसल्याने ‘एक जत्रा आणि कारभारी सतरा’ अशी विनोदी अवस्था झालेली पहायला मिळत आहे. मुंबईतील मतदासंघांपैकी अनेक शिवाय ठाणे, कल्याण, नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा मतदार संघांची डोकेदुखी वाढलेली असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पक्षाने केरळला धाडले. तिरुवनंतपुरम, पद्मनाभ दर्शन आणि कोलमच्या निसर्गरम्य दौऱ्यानंतर त्यांनी जे नागपूर गाठले ते तिथल्या निवडणुकीचे निमित्त करून मुक्कामच टाकला आहे. परिणामी राज्यभरातील मंडळींना विमान पकडून नागपूर गाठावे लागत आहे. इकडे मुख्यमंत्री आणि दादांना मात्र ही सोय नसल्याने प्रत्येकाच्या तावडीत तेच सापडत आहेत. चार दिवसात नागपूरचे मतदान होईल पण महायुतीला अद्याप राज्यातले सर्व जागावाटप करता आलेले नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर दक्षिण अशा नऊ मतदार संघातील वाद कायम आहे. सामंत यांना विधान परिषदेची ऑफर देऊन कोकणातील वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे आणि सातारा लोकसभा मतदार संघात 21 दिवसांनी मतदान आहे. तिथे प्रचाराला वेळ किती राहणार हा प्रश्न आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे 13 मेला औरंगाबाद मतदारसंघ तर उर्वरित जागांवर 20 मे रोजी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे अजूनही सकारात्मक चर्चा सुरूच आहे! भुजबळ तर म्हणतात जोपर्यंत जागा जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला हक्क सांगण्याचा अधिकार आहे! कदाचित अर्ज माघारी पर्यंत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे रुसवे फुगवे काढायचे चालते तसे आता लोकसभेला पण होणार आणि ऐनवेळी तिकिटांचा जॅकपॉट लागलेला व्यक्ती लोकांना खासदार म्हणून निवडावा लागणार का? हा प्रश्न आहे. प्रत्येकजण आमच्या केवळ तीन, चार जागांचा प्रश्न उरलाय असे सांगायचे. पण, अशा प्रत्येकाच्या तीन, चार मिळून बारा जागा अधिक एखादी जास्तीची अशा 15 ठिकाणी वाद धुपत राहिला! हे अजबच होते आणि कुठेना कुठे प्रत्येक गोष्टीचा निर्णय आपण दिल्लीतून शिक्कामोर्तब करून आणू अशी प्रत्येकजण खात्री बाळगून होते. त्यांना यानिमित्ताने वास्तवाची चुणूक दिसली. दिल्ली कुणाचीच नसते. आपले शेजारीच आपले सख्खे आहेत याची जाणीव झाली तरी ते मान्य करतील अशातला भाग नाही. कारण, स्पर्धेत त्यांचे नाव हेच मोठे भांडवल असते. त्यांचा हवाला देऊन जो तो वेळ कढत असतो. परिणामी मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचा तिढा सोडवू शकले नाहीत. फडणवीस यांनी आधीच कल्याण एकतर्फी मुख्यमंत्रीपुत्राला दिल्याची घोषणा करून आता ठाणे आम्हाला! असा चतुर प्रस्ताव ठेवला. मुंबईमध्ये तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी भाजपची शिवसेनेसोबत रस्सीखेच सुरू आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा असायचा तो आम्हालाच द्या नाहीतर इथे तुमची ठाकरे सेनेला मदत झाली असे होईल हा शिंदेसेनेचा दावा आहे. मुंबई उत्तर मध्य तर भाजपचा हक्काचा. प्रमोद महाजन यांच्या कन्या खा. पूनम महाजन यांना इथे पर्याय शोधला जातोय. आणि तिथे एका कुठल्या नावावर एकमत भाजपमध्येही होताना दिसत नाही. शिंदेसेना मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात उमेदवार शोधत आहे. कारण खा. गजानन किर्तीकर यांनी मुलाविरुद्ध मैदानात उतरण्यास प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिला आहे. शिंदे यांनी अभिनेता गोविंदा याला प्रवेश दिला पण त्याच्यावर राम नाईक यांनी पूर्वी निवडणुकीत दाऊदचा वापर केल्याचा आरोप आडवा येतोय. अशा एकेक मतदार संघात किती गुंतून पडायचे हे ठरवण्याची गरज असते. महाविकास आघाडीने त्यातल्या त्यात शहाणपण चालवून बऱ्याच ठिकाणी मार्ग काढले. सांगली आणि मुंबईतील दोन जागांचा एखादा तिढा सोडला तर खेळी करायला ते मोकळे झालेत. अशा चर्चेत किती गुंतायचे हे सत्ताधारी आघाडीने आता ठरवायची वेळही संपत आली आहे!

Advertisement

Advertisement
Tags :

.