कर्नाटकाच्या डावात नायरचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / शिमोगा
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील येथे शनिवारी सुरू झालेल्या सामन्यात गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान कर्नाटकाने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 222 धावांपर्यंत मजल मारली. करूण नायरच्या नाबाद अर्धशतकाने कर्नाटकाचा डाव सावरला. गोवा संघातील अर्जुन तेंडुलकरने 47 धावांत 3 तर कौशिकने 24 धावांत 2 गडी बाद केले.
या सामन्यात गोवा संघाने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजी दिली. गोव्याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर कर्नाटकाची एकवेळ स्थिती 4 बाद 65 अशी केविलवाणी झाली होती. अर्जुन तेंडुलकरने कर्नाटकाला पहिला धक्का देताना निकिन जोशला केवळ 3 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर तेंडुलकरने कर्नाटकाच्या श्रीजितला खाते उघडण्यापूर्वी तंबूचा रस्ता दाखविला. कौशिकने कर्णधार अगरवालला झेलबाद केल्याने कर्नाटकाची स्थिती अधिकच केविलवाणी झाली. अगरवालने 69 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. कौशिकने कर्नाटकाचा फलंदाज समरन याला 3 धावांवर बाद केले. करुण नायर आणि अभिनव मनोहर या जोडीने संघाला सावरताना पाचव्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. अर्जुन तेंडुलकरने अभिनव मनोहरला कौशिककरवी झेलबाद केले. त्याने 64 चेंडूत 6 चौकारांसह 37 धावा जमविल्या. करुण नायर व श्रेयस गोपाल यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 94 धावांची भागिदारी केली. श्रेयस गोपाल 1 षटकार आणि 5 चौकारांसह 48 तर नायर 1 षटकार आणि 7 चौकारांसह 86 धावांवर खेळत आहे. गोवा संघातर्फे अर्जुन तेंडुलकरने 47 धावांत 3 तर कौशिकने 24 धावांत 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक प. डाव 69 षटकात 5 बाद 222 (करुण नायर खेळत आहे 86, श्रेयस गोपाल खेळत आहे 48, अभिनव मनोहर 37, अगरवाल 28, अवांतर 17, अर्जुन तेंडुलकर 3-47, कौशिक 2-24).