नायरने सावरला टीम इंडियाचा डाव
पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 6 बाद 204 धावा : करुण नायरचे नाबाद अर्धशतक : ओव्हल कसोटीत पावसाचा लपंडाव
वृत्तसंस्था/ओव्हल, लंडन
येथील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना करुण नायरला सूर गवसला आहे. नायरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 बाद 204 धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस नायर 52 तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावांवर खेळत होते. विशेष म्हणजे, संपूर्ण मालिकेत एकदाही भारतीय संघ नाणेफेक जिंकू शकला नाही. प्रारंभी, इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरवात केली. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताच्या स्कोर बोर्डवर 10 धावा लागलेल्या असताना जैस्वाल बाद झाला. त्याला गस अॅटकिन्सनने बाद केले. जैस्वाल 9 चेंडूचा सामना करत 2 धावा करून माघारी गेला. त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन मैदानात आला. साई आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
नायरचे नाबाद अर्धशतक
चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 3 बाद 85 धावा केल्या होत्या. चहापानानंतर साई सुदर्शन जोश टंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 6 चौकारासह 38 धावांचे योगदान दिले. रविंद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल हे दोघेही फारसे प्रभावी ठरले नाही. जडेजाला 9 धावांवर टंगने बाद केले तर जुरेल 19 धावा कारुन माघारी परतला. एकीकडे, विकेट पडत असताना करुण नायरने मात्र संयमी खेळी साकारताना अर्धशतक झळकावले. त्याने 7 चौकारासह 52 धावांची खेळी साकारली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने 19 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांत अर्धशतकी भागीदारी झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 6 गडी गमावत 204 धावा केल्या होत्या. नायर 52 तर सुंदर 19 धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सन आणि जोश टंगने 2, तर ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.
9 वर्षानंतर करुणचे अर्धशतक
क्रिकेट मला अजून एक संधी दे‘ म्हणणाऱ्या करूण नायरला अखेरीस क्रिकेटने एक नाही दोन संधी दिल्या. नायरने दुसऱ्या संधीचं सोन करत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. करूणने तब्बल 3147 दिवसांनंतर म्हणजेच तब्बल 9 वर्षानंतर त्याचे कसोटी अर्धशतक झळकावलं आहे. याआधी 2016 मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी खेळी साकारली होती. यानंतर आता इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 64 षटकांत 6 बाद 204 (यशस्वी जैस्वाल 2, केएल राहुल 14, साई सुदर्शन 38, शुभमन गिल 21, करुण नायर खेळत आहे 52, जडेजा 9, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 19, टंग, अॅटकिन्सन प्रत्येकी 2 बळी).