ग्रेड पे 4800 रूपयांच्या मागणीसाठी नायब तहसीलदारांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
नायब तहसीलदार (राजपत्रित वर्ग-2) यांचे ग्रेड पे 4800 रूपये करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर राज्य सरकारला द्यावयाचे स्मरण पत्र अपर चिटणीस स्वप्निल पवार यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जिह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी धरणे आंदोलन केले. यानंतर राज्य सरकारला द्यावयाचे स्मरण पत्र व निवेदन अपर चिटणीस स्वप्निल पवार यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, नायब तहसीलदार अन्य विभागाच्या कामानिमित्त समन्वय व नियंत्रण, यासह कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारा सांभाळत असल्यामुळे सन 1998 मध्ये सरकारने नायब तहसीलदार पदास राजपत्रित वर्ग- 2 चा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर संवैधानिक मार्गाने न्यायाची मागणी मंजूर करण्याबाबत राज्य सरकारकडे विनंती करत असतानाही अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. येत्या 28 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे, याची सरकारने नोंद घ्यावी.
आंदोलनात तहसीलदार सर्वश्री सुर्यकांत पाटील, सी. बी. सानप,सरस्वती पाटील, सुनीता नेर्लीकर, नायब तहसीलदार सर्वश्री दिगंबर सानप, प्रज्ञा कांबळे, ऊपाली सुर्यवंशी, डॉ. अर्चना कुलकर्णी, विजय जाधव, हेमंत कामत, अस्लम जमादार, सुशांत कांबळे, संजय मधाळे, रवींद्र मोरे, एस. एम. गवळी आदी सहभागी झाले होते.