नागपूरची दिव्या देशमुख विश्वचषक विजेती
कोनेरू हम्पीवर केली परतीच्या टायब्रेकरमध्ये मात, ग्रँडमास्टर किताबही कमावण्यात यशस्वी
वृत्तसंस्था/ बातुमी, जॉर्जिया
भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने सोमवारी येथे अनुभवी सहकारी कोनेरू हम्पीवर टायब्रेकरमध्ये विजय मिळवून फिडे महिला विश्वचषक पटकावत तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या विजयामुळे 19 वर्षीय खेळाडूला केवळ प्रतिष्ठित जेतेपद मिळालेले नाही, तर तिला ग्रँडमास्टर किताब देखील मिळाला आहे. स्पर्धेच्या सुऊवातीला हे अशक्यवत वाटले होते.
नागपूरच्या खेळाडूचा विजय शनिवारी आणि रविवारी खेळल्या गेलेल्या दोन क्लासिकल गेममध्ये बरोबरी झाल्यानंतर आला. अनिर्णीत सामन्यांनंतर टायब्रेकरचा पहिला संच निर्णायक ठरला. कारण हम्पीने या लढाईत पराभव पत्करला. विश्वचषक आणि महिला जागतिक स्पर्धा वगळता हम्पीने सर्व काही जिंकले आहे. विश्वचषक विजेतेपद तिला पुन्हा एकदा आणि जवळ पोहोचल्यानंतरही हुकले. सोमवारी देशमुखने दृढनिश्चय दाखवला आणि त्याचा बोनस ग्रँडमास्टर किताबाच्या रुपाने प्राप्त झाला.
चौथी भारतीय महिला ग्रँडमास्टर
देशमुख आता हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांच्यानंतर ग्रँडमास्टर बनण्याची कामगिरी करणारी चौथी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. 38 वर्षीय हम्पी 2002 मध्ये ग्रँडमास्टर बनली, तर दिव्याचा जन्म 2005 मध्ये झाला. देशमुख देशाची 88 वी ग्रँडमास्टर बनली आहे आणि जर ती तिच्या प्रयत्नांत दृढ राहिली, तर तिच्यात मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे. दिव्याने जबरदस्त ऊर्जा दाखवत सुऊवातीच्या टायब्रेकरमध्ये हम्पीवर दबाव टाकला, तिला थकवले आणि नंतर परतीच्या टायब्रेकरमध्ये पूर्णपणे जोर लावला.
सुरुवातीच्या लढतीत पेट्रोफ बचावातून देशमुखने एका वेगळ्या राणी-प्यादे मिडल गेमला संधी दिली आणि हम्पीला चांगली संधी देताना एका प्यादाचा त्याग केला. तथापि, घड्याळात वेळ झपाट्याने सरत असताना हम्पीने पुन्हा एकदा आघाडी घेतली आणि लवकरच ती अशा स्थितीत पोहोचली, जिथे तिच्याकडे देशमुखच्या राणीविरुद्ध एक हत्ती, एक उंट आणि एक प्यादे होते. तथापि, स्थिती बरोबरीच्या जवळ राहिली आणि हम्पीने शेवटी अगदी सहजपणे बरोबरी साधली.
परतीच्या गेममध्ये हम्पीने कॅटलान ओपनिंगचा वापर केला. देशमुख चांगली तयारी करून आली होती आणि तिने जास्त वेळ न घालविता तोडीस तोड उत्तर दिले. हम्पीने सुऊवातीलाच एका प्यादाचा बळी दिला, परंतु त्यानंतरचा शेवटचा टप्पा बरोबरीचा राहिला. पण 40 व्या चालीवर हम्पीने आपला संयम गमावला आणि प्याद्याचा बळी देत आक्रमण करण्याचा तिने प्रयत्न केला. देशमुख अधिक चांगली कामगिरी यावेळी करू शकली असती. असे असले, तरी तिने केलेला खेळ तोवर बरोबरीचा होता. मात्र हा देशमुखचा दिवस होता. कारण हम्पीला वेळ कमी पडला आणि एंडगेममध्ये पुन्हा तिने केलेली चूक युवा भारतीय खेळाडूला जेतेपदाचे यश देऊन गेली.
स्पर्धेपूर्वी नव्हता एकही ग्रँडमास्टर नॉर्म
नागपूरच्या मुलीने विजय मिळवेपर्यंत लढतीत चढ-उतार होत राहिले. आपल्याहून दुप्पट वयाच्या प्रतिस्पर्ध्याविऊद्ध विजय मिळवल्यानंतर भावनिक झालेल्या देशमुखला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. ‘मला हा विजय पचनी पडायला थोडा वेळ हवा आहे. मला वाटते की, नशिबानेच मला ग्रँडमास्टर किताब मिळाला आहे. कारण या स्पर्धेपूर्वी माझ्याकडे एकही ग्रँडमास्टर नॉर्म नव्हता आणि आता मी ग्रँडमास्टर आहे,’ असे दिव्या म्हणाली.
विश्वनाथन आनंदकडून कौतुक
पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, जो खेळाचे बारकाईने निरीक्षण करत होता, त्याने दिव्याच्या विजयाचे कौतुक केले आहे आणि याला ‘भारतीय बुद्धिबळाचा एक आनंदोत्सव,’ असे म्हटले आहे. ‘विश्वचषक जिंकल्याबद्दल, ग्रँडमास्टर बनल्याबद्दल आणि कँडिडेट्स स्पर्धेमध्ये स्थान मिळविल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. जबरदस्त लढाई. कोनेरू हम्पीहे खूप चांगली स्पर्धा खेळली आणि तिने प्रशंसनीय लढाऊ वृत्ती दाखवली. ती एक महान विजेती आहे. हा भारतीय बुद्धिबळाचा, विशेषत: महिला बुद्धिबळाचा एक उत्तम आनंदोत्सव आहे’, असे आनंदने ‘एक्स’वरील आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकार करणार सन्मान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : दिव्या देशमुखच्या या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, ‘दिव्याने कोनेरू हम्पी यांना पराभूत केले आहे. मी त्यांचेही अभिनंदन करतो. त्या ही चांगल्या खेळाडू आहेत. पण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही निश्चितपणे तिचा सन्मान करू. ज्यांनी भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे, अशा खेळाडूंचा योग्य सन्मान झाला पाहिजे. म्हणून मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्याशी चर्चा करून कशा प्रकारे तिचा सन्मान करायचा, हे ठरवू.’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.