नागपूर- गोवा भक्ती महामार्गात अंबाबाई, जोतिबा, बाळूमामा धार्मिकस्थळांचा समावेश: आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महामार्गाच्या कामाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचे आदेश
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हयाच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या ‘नागपूर-गोवा’ या नवीन भक्ती महामार्गाच्या कामाची अधिसुचना तत्काळ प्रसिध्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या महामार्गामध्ये जिह्यातील करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर, संत बाळूमामा मंदिर या धार्मिकस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिह्याच्य पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मंगळवारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केला.
सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे नागपूर-गोवा भक्ती महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची तत्काळ अधिसुचना निर्गमित करण्याच्या सुचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळालाचे व्यवस्थापकिय संचालक यांना दिल्या.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेच्या धर्तीवर, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाप्रमाणे नागपुर-गोवा भक्ती मार्ग 800 किमी लांबीचा सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या सुचना राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. या नवीन महामार्गावर महाराष्ट्रातील 20 मोठया धार्मिकस्थळांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये यापूर्वीच जिल्हयातील अंबाबाई मंदिर व जोतीबा मंदीर या धार्मिकस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील श्री सदगुरु बाळूमामा मंदिर देवस्थानाचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी होत्या. त्याला मान्यता मिळून आता या देवस्थानाचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राधानगरी-दाजीपूर अभयारण्याकडे येणाऱ्या महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हयाचा धार्मिक, पर्यटनदृष्टया व आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे आमदार आबिटकर यांनी पत्रकात म्हंटले आहे.