नागरमुनोळीच्या पांडुरंग सी सी संघाकडे साईराज चषक
मोहन मोरे उपविजेता, आकाश तरेकर सामनावीर, मुक्रम हुसेन मालिकावीर
बेळगाव : आक्रमक फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर पांडुरंग सी.सी नागरमुन्नोळी संघाने मोहन मोरे संघाचा 32 धावांनी पराभव करून 10 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. पांडुरंग सी.सी च्या आकाश तरेकरला सामनावीर, तर मुक्रम हुसेनने मालिकावीरसह बक्षीससाह दाखल ठेवण्यात आलेल्या दुचकी वाहन मिळविले. व्हॅक्सीन डेपो मैदानावर साईराज स्पार्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी सकाळी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एस.आर. एस हिंदुस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्व गडी बाद 79 धावा केल्या. प्रथमेश चव्हाण 2 षटकार 2 चौकारासह 19 चेंडूत 34, ब्रितेशने एक षटकार एक चौकारासह 16, रवी गुप्ताने 10 धावांचे योगदान दिले. पांडुरंग सीसीतर्फे मुक्रम हुसेनने 17 धावात 5 गडी बाद केले.मयूर व करण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत सुरेख साथ दिली.
त्यानंतर पांडुरंग सीसी संघाने 7 षटकात 3 गडी बाद 81 धावा करून सामना 7 गड्यानी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.गौस शेखने 5 चौकाराच्या मदतीने 15 चेंडूत नाबाद 27, अक्षय पवारने 3 षटकारसह नाबाद 20, तर आकाश तरेकरने 2 षटकार, एक चौकारासह 18 धावा केल्या. दुपारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मोहन मोरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना पांडुरंग सी सी संघाने 10 षटकात 4 गडी बाद 108 धावा केल्या. आकाश तरेकरने 5 उत्तुंग षटकार व एक चौकाराच्या मदतीने 12 चेंडूत आक्रमक 38 धावा केल्या. अक्षय पवार व गौस शेख यांनी एक षटकार 2 चौकारासह प्रत्येकी 21 तर करण मोरेने 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. मोहन मोरे संघातर्फे प्रज्योत आंबिरे, सागर व सोहेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 10 षटकात 8 गडी बाद 76 धावा केल्या.मुजमीलने एक षटकार एक चौका सह 16, सोहेलने 2 चौकार, एक षटकारसह 14 धावांचे योगदान दिले. पांडुरंग सीसीतर्फे मयूरने 10 धावात 3, सलीमने 15 धावात 2, मुक्रम हुसेनने 20 धावात 2 गडी बाद केले. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते महेश फगरे, जगजंपी बजाजचे संचालक मल्लीकार्जुन जगजंपी, शशिकला जगजंपी, अमर सरदेसाई, प्रणय शेट्टी, विजय धामणेकर, लक्ष्मण धामणेकर, शितल वेसणे, गजानन फगरे, रोहित फगरे, वल्लभ कदम, विनायक देवन आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पांडुरंग सीसी संघाला 2 लाख ऊपये रोख व आकर्षक चषक, तर उपविजेत्या मोहन मोरे संघाला एक लाख ऊपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट संघ गो-गो स्पोर्ट्स, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुशील बुरले एसआरएस हिंदुस्तान, इम्पॅक्ट खेळाडू मुजमिल खान मोहन मोरे, उत्कृष्ट फलंदाज व अंतिम सामन्यातील सामनावीर आकाश तरेकर पांडुरंग सीसी, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार तावडे गो-गो स्पोर्ट्स यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर म्हणून अमरसर देसाई यांनी पुरस्कृत केलेली दुचाकी वाहन पांडुरंग सीसीच्या मुक्रम हुसेन यांनी पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते मुक्रम हुसेनला दुचाकी वाहनाचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कोल्हापूरचे सुनील पाटील, मुंबईचे सचिन सांगेकर, अनंत माळवी यांनी काम पाहिले. तर स्कोरर म्हणून कल्पेश संभाजी व ऑनलाइन स्कोर म्हणून परवेश आणि काम पाहिले. सामन्यांचे समालोचन महाराष्ट्राचे चंद्रकांत शेटे, अभिषेक असलकर, नासीर पठाण, नाना, अरिफ बाळेकुंद्री, मैफूज दफेदार, यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्र्रम घेतले.