भारतीय डेव्हिस संघात नागल, भांब्रीचे पुनरागमन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या 2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या स्वीस विरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीने 8 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. या संघात सुमित नागलचे तब्बल दोन वर्षांनंतर पुनरागमन होत आहे.
त्याचप्रमाणे या संघात युकी भांब्रीलाही निवड समितीने संधी दिली आहे. मात्र रामकुमार रामनाथनला वगळण्यात आले आहे. भारत आणि स्वीस यांच्यातील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील व़िश्व गट 1 मधील पहिल्या फेरीची लढत 12 सप्टेंबरपासून स्वीसमधील बायल येथे खेळविली जाणार आहे. या लढतीसाठी भारताचा टेनिसपटू सुमित नागलचे पुनरागमन तब्बल दोन वर्षांनंतर झाले आहे. नागलने यापूर्वी म्हणजे 2023 च्या सप्टेंबर महिन्यात लखनौ येथे झालेल्या मोरोक्को विरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीमध्ये आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. मोरोक्को विरुद्धच्या लढतीत नागलने आपले दोन्ही एकेरीचे सामने जिंकून भारताला 4-1 असा विजय मिळवून दिला होता. 2024 च्या फेब्रुवारीमध्ये पाकमध्ये झालेल्या ऐतिहासिक डेविहस चषक लढतीसाठी नागलने पाकला प्रयाण करण्याचा नकार दिला होता. तसेच स्वीडन आणि टोगो विरुद्धच्या लढतीतही त्याने आपला सहभाग दर्शविला नव्हता. सुमित नागल सध्या एटीपीच्या मानांकनात 306 स्थानावर आहे. भारतचा करण सिंग 403 व्या तर आर्यन शहा 442, शशिकुमार मुकुंद 463, डी. सुरेश 790 व्या स्थानावर आहेत.
स्वीस विरुद्ध होणाऱ्या या आगामी डेव्हिच चषक लढतीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये युकी भांब्रीचे पुनरागमन झाले आहे. भांब्री दुहेरीच्या मानांकनात 35व्या तर एन. श्रीराम बालाजी 75 व्या स्थानावर आहेत. ऋत्विक बोलीपल्ली हा या लढतीसाठी राखीव खेळाडू खेळाडू म्हणून रामकुमार रामनाथनला या लढतीसाठी भारतीय डेव्हिस चषक संघातून वगळण्यात आले आहे. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात रामकुमार रामनाथन सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येत आहे. भारत आणि स्वीस यांच्यात आतापर्यंत तीनवेळा डेव्हिस लढती असून त्यापैकी दोन लढतीमध्ये भारताने विजय नोंदविला आहे. 1993 साली या दोन संघामध्ये शेवटची गाठ पडली होती आणि यजमान भारताने स्वीसवर 3-2 असा विजय मिळविला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या लढतीत विजय मिळविणारा संघ 2026 च्या डेव्हिस चषक पात्र फेरीत सहभागी होईल. तर पराभूत होणाऱ्या सघाला पुढील वर्षी पुन्हा विश्वगट-1 मध्ये जावे लागेल.
भारतीय डेव्हिस चष्घ्क संघ सुमित नागल, करण सिंग, आर्यन शहा, युकी भांब्री एन. श्रीराम बालाजी, राखीव : डी. सुरेश, शशिकुमार मुकुंद व बोलीपल्ली