नदाल, सिनेर विजयी, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या माद्रिद खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदाल तसेच इटलीचा सिनेर यांनी आपले शानदार विजय नोंदविले. महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले.
पुरूषांच्या विभागातील झालेल्या सामन्यात नदालने कॅचिनचा 6-1, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र नदालला या विजयासाठी तब्बल 3 तास झगडावे लागले. नदालचा पुढील फेरीतील सामना 31 व्या मानांकित लिहेकाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेरने पॅव्हेल कोटोव्हचा 6-2, 7-5, रशियाच्या मेदव्हेदेवने सेबेस्टियन कोर्दाचा 5-7, 7-6 (7-4), 6-3, नॉर्वेच्या कास्पर रुडने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचा 6-2, 6-4 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने सारा सोरीबेसचा 6-1, 6-0, 11 व्या मानांकित बिट्रेझ हेदाद माईयाने पाचव्या मानांकित मारिया सॅकेरिचा 6-4, 6-4 तसेच सबालेंकाने कॉलिन्सचा 4-6, 6-4, 6-3, मिरा अँड्रेव्हाने जस्मिन पाओलिनीचा 7-6 (7-2), 6-4, चौथ्या मानांकित रिबाकेनाने बेजलेकचा 6-1, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या मॅडिसन किझने आपल्याच देशाच्या कोको गॉफचा 7-6 (7-4), 4-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.