For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसी-814 अपहरणाशी संबंधित रहस्य

06:01 AM Jan 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयसी 814 अपहरणाशी संबंधित रहस्य
Advertisement

दोन लाल अन् एक काळी सुटकेस

Advertisement

काही रहस्य नेहमीच रहस्य राहतात. 25 वर्षांपूर्वी 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट आयसी-814 च्या अपहरणाशी निगडित काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. भारताच्या इतिहासात ही अपहरणाची सर्वाधिक काळ चाललेली घटना होती. या घटनेशी निगडित काही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यापैकी एक ब्लॅक ब्रीफकेस अणि दोन लाल बॅग आहेत. या ब्रीफकेस आणि लाल बॅगेत काय ठेवले होते, हे अद्याप रहस्य आहे.

.आयसी-814 च्या अपहरणाची कहाणी नेटफ्लिक्सवर सीरिजच्या स्वरुपात आली आहे. ‘आयसी-814 : द कंधार हायजॅक’ नावाने आलेल्या या सीरिजमध्ये अपहरणाशी निगडित अनेक पैलू दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु अद्याप काही रहस्य कायम आहेत. सीरिजमध्ये लाल बॅग एकाला काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयसी-814च्या कार्गो होल्डमध्ये ठेवताना दाखविण्यात आले होते. यात स्फोटके होती असे बोलले जाते. परंतु या बॅगेत आरडीएक्स होते का ग्रेनेड याविषयी अधिकृतपणे काहीच माहिती समोर आलेली नाही. तर तत्कालीन विदेशमंत्री जसवंत सिंह यांनी स्वत:चे पुस्तक ‘इन सर्व्हिस ऑफ इमर्जंट इंडिया- अ कॉल टू ऑनर’मध्ये याविषयी काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

दुसरी बॅग जसवंत सिंह यांच्याकडेच होती. मुक्तता करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांना कंधार येथे घेऊन गेले असता ही बॅग त्यांच्याकडेच होती. त्या बॅगेत ठेवलेले सामान आजही रहस्य आहे. काँग्रेसने या त्या लाल बॅगेविषयी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मग एक ब्लॅक ब्रीफकेस आहे, जी कंधारच्या उ•ाणात विदेशमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत गेलेले भारतीय अधिकारी घेऊन गेले होते.

कंधार अपहरण

24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाईन्सची फ्लाइट आयसी-814 ने काठमांडू येथून दिल्लीसाठी उ•ाण केले. या विमानात 15 क्रू मेंबर्ससमवेत 191 प्रवासी सवार होते. हे विमान भारतीय हवाईहद्दीत येताच 5 दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी कॅप्टन देवी शरण यांना विमान काबूलला नेण्यास सांगितले होते. काबूलपर्यंत जाण्यासाठी विमानात इंधन नसल्याचे सांगितल्यावर दहशतवाद्यांनी लाहोरमध्ये विमानात इंधन भरण्याचा आदेश दिला. परंतु पाकिस्तानने आयसी-814 ला लाहोर विमानतळावर उतरण्याची अनुमती नाकारली. अशा स्थितीत दहशतवाद्यांसमोर कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्याने रिफ्यूलिंगसाठी विमान अमृतसर येथे नेण्यात आले. अमृतसर विमानतळावर आयसी-814 सुमारे 50 मिनिटांपर्यंत राहिले, परंतु इंधन भरण्यास विलंब होत असल्याने दहशतवाद्यांना गडबड जाणवली आणि इंधन भरून न घेताच त्यांनी कॅप्टन देवी शरण यांना टेक ऑफ करण्यास भाग पाडले. रात्री उशिरा विमानाला दुबईत रिफ्यूल करण्यात आले. परंतु दुबई प्राधिकरणाने महिला आणि मुलांना विमानातून उतरविण्याची अट ठेवली होती. यामुळे दहशतवाद्यांनी 27 प्रवाशांची मुक्तता केली. तसेच रुपिन कात्याल यांचा मृतदेहही उतरविला. रुपिनची हत्या दहशतवाद्यांनीच केली होती.

रिफ्यूलिंगनंतर विमान कंधार येथे नेण्यात आले, त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानी राजवट होती. कंधारमध्ये हे विमान 6 दिवसांपर्यंत राहिले. अपहरणकर्त्यांनी प्रवाशांच्या मुक्ततेच्या बदल्यात 36 दहशतवाद्यांची मुक्तता आणि 200 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती. भारताने दहशतवाद्यांसोबत चर्चा केली, ज्यात तालिबानने मध्यस्थी केली. अखेर भारताने अहमद उमर सईद शेख, मसूद अझहर आणि मुश्ताक अहमद जरगरची मुक्तता केली, ज्यानंतर प्रवाशांची सुखरुप सुटका शक्य झाली होती.

जसवंत सिंहांकडील लाल बॅग

या तीन दहशतवाद्यांना कंधार येथे नेण्यात येत असताना त्या विमानातून तत्कालीन विदेश मंत्री जसवंत सिंह देखील होते. त्यांच्याकडे लाल रंगाची एक बॅग होती. त्या बॅगेत काय होते याविषयी अद्याप रहस्य आहे. परंतु 2006 साली काँग्रेसने या बॅगेत 200 दशलक्ष डॉलर्स असल्याचा आणि ही रक्कम दहशतवाद्यांना देण्यात आल्याचा दावा केला होता. 2006 मध्ये काँग्रेस खासदार मधुसूधन मिस्त्राr यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तीन दहशतवाद्यांसोबत जसवंत सिंह यांना जाण्याची गरज काय होती असा प्रश्न मिस्त्राr यांनी उपस्थित केला. सिंह यांच्याकडील लाल बॅगेत काय होते असेही त्यांनी विचारले होते. वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांना खंडणी दिली असेल तर याप्रकरणी जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. जसवंत सिंह यांनी स्वत:चे पुस्तक ‘इन सर्व्हिस ऑफ इमर्जंट इंडिया-अ कॉल टू ऑनर’मध्ये भारताने दहशतवाद्यांची 200 दशलक्ष डॉलर्सच्या खंडणीची मागणी फेटाळली होती असे नमूद केले आहे. जसवंत सिंह स्वत:सोबत लाल बॅगेतून काय घेऊन गेले होते याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही.

ब्लॅक ब्रीफकेसची कहाणी काय?

भारतातून कंधारला जाणाऱ्या विमानात लाल बॅगच एकमात्र रहस्यमय गोष्ट नव्हती. एक काळ्या रंगाची ब्रीफकेस देखील होती. जसवंत सिंह यांच्यासोबत त्या विमानात चार युवा अधिकारी होते, त्यांनी दहशतवाद्यांच्या सुरक्षेत 2 तास घालविले होते. यात सीबीआयचे माजी संचालक एपी सिंह यांचा समावेश होता, ते त्यावेळी इंडियन एअरलाईन्सचे सीव्हीसी होते. एसपीजीचे मोहीम प्रमुख रंजीत नारायण, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनचे वर्तमान प्रमुख सतीश झा आणि पोलीस अधिकारी सुरेंद्र पांडे यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांच्यासोबत एसपीजी कमांडोंची एक टीम देखील होती असा दावा वरिष्ठ पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी अनेक अधिकाऱ्यांसोबतच्या संभाषणानंतर केला होता. चौधरी यांच्यानुसार ब्लॅक ब्रीफकेसमध्ये 1 लाख डॉलर्स होते. ही रक्कम कंधारमध्ये रिफ्यूलिंगसाठी दिली जाणार होती. अनुमान 40 हजार डॉलर्सचा होता, परंतु टीम खबरदारीदाखल अधिक रोख रक्कम घेऊन गेली होती.

तालिबान लँडिंग चार्ज आणि रिफ्यूलिंग चार्जसाठी कुठलीही पावती देणार नाही याची कल्पना भारतीय पथकाला होती. एपी सिंह आणि पंकज श्रीवास्तव यांना याचीच चिंता होती. त्यांनी 40 हजार डॉलर्सची रक्कम तालिबानला दिली होती. अपहरण करण्यात आलेल्या विमानात शिरल्यावर तेथे सर्वत्र मलमूत्र दिसून आले हेते, कारण एक आठवड्यापर्यंत प्रवाशांसाठी अन्य कुठलीच सोय करण्यात आली नव्हती.

दहशतवाद्यांकडील लाल बॅग

जसवंत सिंह यांच्या लाल बॅगेप्रमाणेच आणखी एक लाल बॅग होती. त्याचे रहस्यही अद्याप उघड झालेले नाही. ही लाल बॅग दहशतवाद्यांची होती. याविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे, परंतु काही जणांकडून याला बॅग नव्हे तर सूटकेस म्हटले गेले आहे. जसवंत सिंह यांनी स्वत:च्या पुस्तकाच्या एका भागात त्या लाल बॅगेविषयी उल्लेख केला आहे. ज्यादिवशी प्रवाशांची मुक्तता करण्यात आली, त्याच दिवशी आयसी-814 कंधारबाहेर नेण्यात आले नाही. कारण या विमानात काहीतरी असून त्याद्वारे स्फोट घडविला जाणार असल्याचा अलर्ट मिळाला होता. त्या विमानाला 8 दिवसांपर्यंत कंधारमध्ये ठेवण्यात आले आणि त्या  लाल बॅगेचे रहस्य कायम राहिल्याचे जसवंत सिंह यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

या लाल बॅगेविषयी 2001 मध्ये खुलासा झाला, तेव्हा तालिबानची राजवट संपुष्टात आली होती आणि तालिबानचे विदेशमंत्री वकील अहमद मुत्तावकीलला अटक करण्यात आली होती. मुत्तावकीलच अपहरणकर्त्यांसोबत चर्चा करत होता. ही लाल बॅग अपहरणकर्त्यांपैकी एकाची होती, यात स्फोटके ठेवण्यात आली होती. तसेच दहशतवाद्यांचे खरे पासपोर्टही त्यात होते. बहुधा घाईगडबडीत दहशतवादी ही बॅग स्वत:सोबत नेणे विसरून गेले होते. काही अपहरणकर्ते मुत्तावकीलच्या लाल पजेरोमध्ये बसून परतले आणि त्यांनी आयसी-814 च्या कार्गो होल्डमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व लाल बॅग दाखविल्या होत्या. ओलीस प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतर हे सर्व घडले होते. अखेर एका लाल बॅग किंवा सुटकेसची ओळख पटविण्यात आली होती असे जसवंत सिंह यांनी पुस्तकात लिहिले आहे.

नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये त्या लाल बॅगेत 17 किलो आरडीएक्स होते असे दाखविण्यात आले होते. परंतु आयसी-814 परत आणण्यासाठी एक विमान पाठविण्यात आले होते, ज्याचे उ•ाण कॅप्टन एसपीएस सूरी यांनी केले होते. त्या लाल बॅगेत ग्रेनेड होते असे सूरी यांनी सांगितल्याचा उल्लेख जसवंत सिंह यांनी केला आहे. सूरी यांना स्थानिक लोकांकडून एक बॅग मिळाल्याचे आणि त्यात पाच हँडग्रेनेड ठेवले होते अशी माहिती मिळाली होती.

अपहरणकर्त्यांसोबत काय घडले?

माजी अफगाणी राजदूत रहमतुल्ला हाशमी यांच्यानुसार आयसी-814 अपहरण करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना एका वाहनात बसविण्यात आले आणि त्यांच्यासोबत एक ताफा पाकिस्तानी सीमेपर्यंत सोबत गेला. याकरता त्यांनी गुप्त मार्गांचा वापर केला होता. या मार्गांचा वापर मुजाहिदीननी रशियन कब्जादरम्यान केला होता. या मार्गावर इमिग्रेशन आणि कस्टम यासारख्या औपचारिकता पूर्ण करण्याची गरज भासली नव्हती. हे सर्व पाकिस्तानी ओसामा बिन लादेनला भेटल्याचे मानले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रवेश केल्याचे गुप्तचर यंत्रणांचे सांगणे होते.

Advertisement
Tags :

.