चीनमध्ये रहस्यमय न्युमोनियाचा फैलाव
चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी : शाळा बंद ठेवण्याचा निर्णय : जागतिक आरोग्य संघटना सतर्क
वृत्तसंस्था /बीजिंग
चीनमध्ये रहस्यमय न्युमोनियाचा आजार वेगाने फैलावत आहे. विशेषकरून लहान मुलांना या आजाराची लागण होत असल्याने रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली आहे. मुलांसाठीच्या रुग्णालयांवरील भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या घडामोडींची दखल घेत चिंता व्यक्त करत लोकांना सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे. याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मुलांमध्ये फैलावणाऱ्या या आजाराविषयी अधिक माहिती पुरविण्यास सांगितले आहे.
अज्ञात न्युमोनियाचा प्रकोप चीनमध्ये वेगाने वाढत आहे. बीजिंगच्या लियाओनिंगमध्ये बालचिकित्सा रुग्णालय आजारी मुलांनी भरून गेले आहे. बीजिंग चिल्ड्रन हॉस्पिटल देखील आजारी मुलांनी पूर्णपणे भरलेले आहे. स्थिती बिघडल्याने अनेक शहरांमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महामारी तज्ञ एरिक फीगल डिंग यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. डिंग यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून यात रुग्णालयांमधील लोकांची गर्दी दिसून येत आहे. लोक स्वत:च्या मुलांवरील उपचारासाठी त्रस्त असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. या अज्ञात आजारावर कुठलाही उपचार अद्याप उपलब्ध नसल्याचेही डिंग यांनी सांगितले आहे.
चीनमध्ये ज्याप्रकारे हा आजार फैलावला आहे ते पाहता जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 13 नोव्हेंबर रोजी देशात एका नव्या आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे सांगितले होते. या आजारात रुग्णांना श्वसनावेळी त्रास होत असून विशेषकरून मुले यामुळे अधिक प्रभावित आहेत. चीनच्या काही क्षेत्रांमध्ये आता या आजारामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. या आजाराच्या रुग्णांपासून सामाजिक अंतर राखण्याची आणि मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. काही रुग्ण घरीच बरे होत आहेत तर काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. वेगवेगळ्या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता वेगवेगळी दिसून येत आहे.
बीजिंग, लियाओनिंगमध्ये संकट
उत्तर चीनमध्ये या अज्ञात आजाराचा प्रकोप अधिक आहे. बीजिंग आणि लियाओनिंगच्या रुग्णालयांमध्ये या रहस्यमय आजाराने प्रभावित मुले सर्वाधिक संख्येत दाखल होत आहेत. या रहस्यमय न्युमोनियामध्ये मुलांना वेदना आणि तीव्र ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याने मुलांना श्वसनावेळी समस्या होऊ लागते. हा आजार वेगाने फैलावल्याने अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये हा आजार प्रामुख्याने मुलांमध्ये फैलावल्याचे दिसून येत असल्याने तो एका महामारीत बदलण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे ओपन-अॅक्सेस सर्व्हिलान्स प्लॅटफॉर्म प्रोमेडने म्हटले आहे.
अधिक माहिती पुरवा
अज्ञात न्युमोनियाच्या वाढत्या धोक्यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने श्वसनाशी निगडित या आजाराची जोखीम करण्यासाठी लोकांनी अनेक प्रकारच्या दिशानिर्देशांचे पालन करावे असे सांगितले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने मुलांमध्ये न्युमोनियाच्या क्लस्टरवर विस्तृत माहिती देण्याची अधिकृत विनंती चीनकडे केली आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून उत्तर चीनमध्ये इन्फ्लुएंजासदृश आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.