जपानमधील रहस्यमय समुद्रकिनारा
चहुबाजूला जणू तारेच विखुरल्याचा होतो भास
जगरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी स्वत:च्या अनोख्या सौंदर्याने अचंबित करत असतात. जपानमध्ये एक असेच अद्भूत ठिकाण आहे, जे स्वत:च्या ‘तारेयुक्त वाळू’साठी प्रसिद्ध आहे. हे केवळ सुंदर दृश्य नसून निसर्गाचा एक अनोखा चमत्कार देखील आहे. जपानमध्ये एक प्रसिद्ध समुद्रकिनारा असून त्याचे नाव होशिजुना-नो-हामा आहे. हा समुद्रकिनारा जपानच्या ओकिनावा प्रीफेक्चरमध्ये इरिमोते बेटावर आहे. याचे नाव होशिजुना-नो-हामा असून याचा अर्थ ताऱ्याच्या आकारातील वाळू असा आहे. पहिल्या नजरेत हा जपानच्या शेकडो अन्य समुद्र किनाऱ्यांपेक्षा वेगळा वाटत नाही, परंतु याला जवळून पाहिल्यास येथील वाळूचे अनेक कण पाच किंवा 6 टोकदार ताऱ्यांच्या आकारासारखे असतात असे दिसून येईल.
होशिजुना-नो-हामा समुद्रकिनाऱ्याचा मोठा हिस्सा फोरॅमिनिफेरस नावाच्या अब्जावधी प्रोटोजोआच्या बाहेरील सांगाड्यांनी निर्माण झालेला आहे. हे छोटे सागरी जीव समुद्रतळावर वाढतात आणि मृत्यूनंतर त्यांचे कॅल्शियम कार्बोनेटचे आच्छादन शिल्लक राहते. हे आच्छादन सातत्याने सागरी लाटांसोबत किनाऱ्यावर येतात. यामुळे हा आकर्षक नैसर्गिक चमत्कार होतो. या ताऱ्यांचा आकार वाळूच्या कणाइतकाच मोठा असतो. याचमुळे त्यांना प्रथमदर्शनी ओळखणे अवघड असते. परंतु हे छोटे तारे बोटांना चिकटताच हे सामान्य वाळूच्या कणांपेक्षा वेगळे असल्याचे कळते. काही लोक विशेष स्वरुपात ताऱ्याच्या आकाराची वाळू शोधण्यासाठी होशिजुना-नो-हामा येथे येतात. ज्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना या अनोख्या वाळूला घरी नेण्यास मनाई केली आहे. या स्टारसँडवरून अनेक प्रकारच्या मान्यता देखील आहे. एकीकडे वैज्ञानिक ताऱ्यासारख्या वाळूला अब्जावधी फोरॅमिफेरसच्या सांगाड्याप्रमाणे पाहतात. तर दुसरीकडे स्थानिक लोक एका दंतकथेनुसार वाळूच्या कणाला दक्षिण क्रॉस आणि उत्तर ताऱ्याचे छोटे पुत्र मानतात.