म्यानमार सैन्याचा रखाइनमधील रुग्णालयावर हवाई हल्ला
हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू : 70 जखमी
नेपीडा : म्यानमारच्या सैन्याने गुरुवारी रखाइन प्रांतात मोठा हल्ला केला आहे. म्यानमारच्या सैन्याने रुग्णालयाला लक्ष्य करत हवाईहल्ला केला असून यात कमीतकमी 31 जण मारले गेले आहेत. तर सुमारे 70 जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अराकान आर्मीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम रखाइन प्रांताच्या म्राउक-यू शहरातील या रुग्णालयाला सैन्याने लक्ष्य पेले आहे. सैन्याने मागील काही काळापासून बंडखोरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. रुग्णालयाच्या हल्ल्यांमधील मृतांची संख्या वाढू शकते. जखमींपैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे. रुग्णालयावर रात्रभर बॉम्ब टाकण्यात आल्याचे कर्मचारी वाई हन आंग यांनी सांगितले आहे. म्यानमारच्या सैन्याने मागील आठवड्यात सगाइंग येथे एका दुकानावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात कमीतकमी 18 जणांचा मृत्यू झाला होता. तर 20 जण जखमी झाले होते. म्यानमारच्या सैन्याने 28 डिसेंबर रोजी निवडणूक करविण्याची घोषणा केली आहे. गृहयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सैन्याचे सांगणे आहे. तर दुसरीकडे बंडखोर समुहांनी स्वत:च्या नियंत्रणातील क्षेत्रांमध्ये निवडणूक रोखण्याची शपथ घेतली आहे. सैन्य या क्षेत्रांवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी हवाई हल्ले करत आहे.