महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माझी देवपूजा

06:44 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वयंपाकघराशिवाय घर हे वास्तव समोर असताना घरात एक देवघर असावे अशी अपेक्षा करणे चुकीचेच आहे, नाही का? नव्या पिढीला वाटते की ‘आमची कर्मपूजा ही काळवेळ नसलेली. बराच वेळ चालते. त्यात परत ही देवघराची नवी भर कशाला? देवघरातल्या मूर्तींची पूजा कुणी अन् कां करायची? पूजा केली नाही तर देव रुसतो का? आम्ही तर माणसांमध्येच देव बघतो आणि त्याला पूजतो सुद्धा!’  सर्वांभूती परमेश्वर हा भाव उच्च प्रतीचाच आहे, परंतु आचरणात आणणे तेवढेच कठीण आहे. सगळ्यांमध्ये, अगदी पशुपक्षी, झाडे, वेली, फुले यांत परमात्मा बघणे हीच खरी पूजा आहे परंतु ते सोपे मुळीच नाही. हातावर डास बसला की माणसाकडून त्याला नकळत एक चापट बसते आणि तो मरतो. मुंगी अंगावर चढली तर तिला चिमटीत धरून फेकून दिले जाते. एवढेच कशाला? डास मरावे म्हणून डासांसाठी गुड नाईट, मुंग्या-झुरळांसाठी क्रेझी लाईन्स, मधमाशी-किडे- पाली यांच्यासाठी घरात पेस्ट कंट्रोल हे सारे जण करतात, करावे असा आग्रह करतात. चुकून उंदीर घरात शिरला तर त्याला मारायचे भरपूर उपाय आहेत. एक गोष्ट तर कधी लक्षातही येत नाही की हिरवळीवर मन शांत व प्रसन्न होण्यासाठी बसले की हात हिरवळीवर पडतो आणि ती उपटायचा मनाला उगीचच चाळा लागत असतो. हिरवळ ही जिवंत असते. झाडावरची फुले पहाटे देवाच्या पूजेसाठी चोरून तोडताना अनेक लोक ती अक्षरश: ओरबाडतात. पूजेसाठी झाडांची पत्री तोडतानाही क्रूरपणा असतो. रस्त्यात बसलेल्या गाईगुरांना खुशाल काठी मारतात. कुत्र्यामांजरांना दगड मारणे तर नेहमीचेच आहे. माणसे नकळत सतत हिंसा करीत असतात. ती लक्षात येत नाही. सर्वांठायी परमेश्वर हे फक्त म्हणायचे. प्रत्यक्षात ते उतरत नाही. ते जगण्यात उतरण्याची पहिली पायरी म्हणजे देवघरातल्या देवांची पूजा आहे.

Advertisement

षोडशोपचार पूजा हा पूर्वापार चालत आलेला संस्कार आहे. पूर्वी घरोघरी फक्त पुरुषच पूजा करायचे. ती त्यांची जबाबदारी होती. सोवळ्याने पाणी भरून, पवित्र पोशाख लेऊन, कपाळी गंध लावून आसनावर बसून तास न् तास पूजा चालायची. कारण तेव्हा वेळ मुबलक होता. शिवाय घरातल्या गृहिणी पूजेची साग्रसंगीत तयारी करून द्यायच्या. रांगोळी काढायच्या. पंचामृत तयार करणे, गंध उगाळणे, फुलांची निवड करणे, तुळशी, बेल, दुर्वा, नैवेद्य सगळे कसे हातोहाती पुरुषांना मिळायचे. नंतर पुरुषांनी वेळेअभावी आणि पूजेतला श्रद्धाभाव कमी झाल्याने ती करणे जमणार नाही असे जणू जाहीरच करून टाकले. मग काय? पापभिरू मनाच्या आणि कुठे चुकले तर उगीच संकट यायचे म्हणून धसका घेतलेल्या गृहिणींनी देवघराचा ताबा घेतला. जमेल तशी, जमेल तेव्हा त्या पूजा करू लागल्या. देवासाठी हार करू लागल्या. धुपारती, कर्पूरआरती करून दोन हात मनोभावे जोडून कुटुंबाच्या सौख्यासाठी मन:पूर्वक प्रार्थना करणाऱ्या स्त्रिया आजही तुरळक प्रमाणात का होईना पण आढळतात. नंतर त्यांच्या मुलाबाळांनी मात्र पूजेला टाटा केला. त्यांची मने शिक्षेचा उगीच धाक असलेली मुळी राहिलीच नाहीत. मुले धाडसी आणि स्वतंत्र आहेत हे आपण बघतो. मात्र श्रावणातली सत्यनारायणाची पूजा किंवा वास्तुशांतसारखी मोठी पूजा, गौरीपूजा अशा अनेक पूजा नवीन पिढी मंगल वेष धारण करून, दागिने घालून मोठ्या भक्तिभावाने करते, हेही नसे थोडके. गुरुजींचं ते ऐकतात. गुरुजी सांगतील तसे करतात. त्यातूनही त्यांना आनंद मिळतो. नव्या पिढीलाही समजून घ्यायलाच हवे.

Advertisement

देवांची पूजा करणे म्हणजे नेमके काय हे सांगताना मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्राr किंजवडेकर म्हणतात, ‘पूजाविधी हा निराळ्या स्वरूपात एक योगाभ्यासच आहे. नित्य देवार्चनाने आसनांचा अभ्यास प्राणायाम तर आहेच. प्रत्याहार हाही वेळेपुरता होतो. त्यामुळे इंद्रियांना वळण लागते आणि थोड्या काळापुरतं इंद्रिये विषयांपासून दूर होतात. इंद्रिय जय साधतो मूर्तीवर. धारणा, नंतर ध्यान आणि मग समाधी असा अभ्यास देवपूजेत प्रतिदिवशी होतो. पूजनीय पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, देवघरातल्या लहानग्या गोपाळकृष्णाची पूजा का करायची? ती वरच्या श्रेणीची पूजा आहे. देवाला बाळ करायचे. का? तर बाळाजवळ कुणी रडत जात नाही. लहान मुलांकडे मागायचे नसते, त्यांना द्यायचे असते. भक्तीमध्ये उंच शिखरावर माणूस गेला की तो काहीच मागत नाही. तो फक्त भाव ओतत राहतो. पूजा हे एक भक्तिशास्त्र असून त्यामागे उन्नत होण्यासाठी लागणारा उदात्त भाव साठला आहे.

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु  गुरुर्देवो महेश्वरा 

गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम?’

हा श्लोक घरोघरी रोजच म्हटला जातो. सद्गुरूपूजेमध्ये सारे देव सामावतात. सद्गुरूंची पाद्यपूजा करायला मिळणे हे मोठे भाग्यच असते. सद्गुरूंच्या चरणांमध्ये सगळी तीर्थे सामावलेली असतात. शिवदिन केसरी यांचा एक गोड अभंग आहे. ‘माझी देवपूजा, पाय तुझे गुरुराया..’ ते म्हणतात, ‘गुरुचरणाची माती, तीच माझी भागीरथी’.  गुरुचरणांची धूळ भक्त एका डबीत भरून ठेवतात कारण भक्तांच्या दृष्टीने तीच गंगा असते. त्या धुळीचे स्नान हेच गंगास्नान असते. ‘गुरुचरणाचा बिंदू, तोच माझा क्षीरसिंधू’.  गुरुचरणात सप्तद्वीपे असतात. सप्तद्वीप म्हणजे सात समुद्रांनी वेढलेली द्वीपे होय. पृथ्वी ही खाऱ्या समुद्राने, त्यापलीकडे लक्षद्वीप हे उसाच्या रसाच्या समुद्राने, त्यापलीकडे शाल्मल हे मदिरासमुद्राने, क्रौंच हे तुपाने, पुष्कर गोड पाण्याने असे वेढलेले समुद्र आहेत.

पुढचा चरण आहे- ‘गुरुचरणाचे ध्यान, तेचि माझे संध्यास्नान..’ गुरुचरणाच्या ध्यानाने तनमनावरचा मळ निघून जातो. वाईट संचित पुसून जाते. ‘शिवदिन केसरी पाही, सद्गुरुवाचोनी दैवत नाही’. सद्गुरू हे परमदैवत आहे. सृष्टीमध्ये असलेले चैतन्य म्हणजे सद्गुरू आहेत. ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे/ठेवीन मी मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.’ याचा अर्थ अवघ्या सृष्टीमधले चैतन्यलेणे सद्गुरू आहेत. घटाघटात सद्गुरूंना बघणे हीच सर्वेश्वराची पूजा आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी मानसपूजा सांगितली आहे. मनाने आपल्या इष्टदेवतेची सचेतन मूर्ती डोळ्यांसमोर आणून तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार काल्पनिक पूजा करणे म्हणजे मानसिक पूजा होय. महाराज म्हणतात, काळ फार कठीण येत चालला आहे. देवादिकांची पूजा करण्यास स्वस्थता व वेळ दुर्मिळ झालाय म्हणून साधकाने मानसपूजा करावी. मानसपूजेमध्ये  भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढते. मनापासून मानसपूजा केली तर उपास्य देवतेला ती सवय लागते आणि ती त्यावेळी भक्तांची वाट बघते.

मोठ्या पूजेनंतर उत्तरपूजाही महत्त्वाची असते. निर्माल्य काढून, देवाला स्नान घालून, नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार करायचा आणि पुनरागमनायच् .....पुन्हा पुन्हा ये असे आळवीत अक्षता टाकून निरोप द्यायचा. कधीही निरोप घेताना ‘या’ म्हणावे, ‘जा’ नाही, ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. रोज नित्यनेमाची पूजा असो की महापूजा, ती मन लावून केली की परमेश्वर प्रसन्न होतोच.

- स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article