For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय

10:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय
Advertisement

सत्कारप्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे उद्गार : लोकप्रतिनिधींना सर्वतोपरी सहकार्य

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. पराजयाने मी खचून गेले नाही. निवडणुकीत जय-पराजय राहणार मात्र, तालुक्यातील जनतेने माझ्यावर पूर्वीएवढाच विश्वास दाखवलेला आहे. हे मतदानावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तालुक्याच्या विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य माझ्याकडून कायम राहील, मी विकासकामात कधीही राजकारण करणार नाही, आणि श्रेयवादात तर पडणारच नाही. त्यामुळे सध्याच्या लोकप्रतिनिधींना माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य निश्चित राहील, असे उद्गार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. ब्लॉक काँग्रेसच्यावतीने अंजली निंबाळकर यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाल्याने तसेच खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार येथील सनया पाममध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार अंजली निंबाळकर यांची काँग्रेसच्या सचिवपदी तसेच प्रियांका जारकीहोळी खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांत पुन्हा नवी उभारी मिळावी तसेच काँग्रेसने तालुक्यात सक्रिय होऊन कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ आणि काँग्रेसचे विचार पोहचविण्यात यावे, असे आवाहन केले.

दोन्ही रणरागिनींनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत

Advertisement

बिळकी-अवरोळी मठाचे मठाधीश चन्नबसव देवरु बोलताना म्हणाले, दोन्ही रणरागिनींनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत तसेच सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वेळ द्यावा, तालुक्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे, असे ते म्हणाले. बेंगळूर येथील गोसावी मठाचे मठाधीश मंजुनाथ स्वामी म्हणाले, शिवरायांच्या जीवनातील आदर्श जपून अंजली निंबाळकर आणि प्रियांका जारकीहोळी यांनी कार्यरत रहावे, सर्वसामान्याना न्याय मिळवून देणे आणि सकल समाजाच्या सर्वागीण विकासासाठी दिलेल्या संधीचा उपयोग करावा, राजकारण फक्त काही वेळापुरते असते. मात्र सर्व जनतेचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजकीय वाटचाल करावी, असे ते म्हणाले. माजी अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, काँग्रेसची विचारधारा ही सर्वसामान्याना घेऊन जाणारी असून तालुक्यातील जनतेला काँग्रेसची विचारधारा पटवून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.

अंजली निंबाळकर यांच्यामुळे खानापूरचे नाव देश पातळीवर

अंजली निंबाळकर यांच्यामुळे खानापूरचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सचिवपद अंजली निंबाळकर यांना मिळाल्याने खानापूर तालुक्याचा निश्चित गौरव झालेला आहे. पुढील काळात निश्चित काँग्रेसचे प्रतिनिधित्व तालुक्याला लाभेल, यात शंका नाही. यावेळी यशवंत बिरजे, लक्ष्मण मादार, सी. जी. वाली यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांची भाषणे झाली. खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सत्काराला उत्तर देताना तालुक्याच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :

.