माजे मोगा...
गाण्याच्या कार्यक्रमाहून यायला खूप उशीर झाला होता. मग येताना ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाला झोप येऊ नये म्हणून मग कुठली गाणी लावावी हे चाललं होतं. गाडीत बसलेले सगळे लोक कलाकार मंडळीच असल्यामुळे बकवास गाणी अर्थातच नव्हती. एक एक करून सगळे उतरले. शेवटी आम्ही दोन मेंबर राहिलो आणि प्लेलिस्ट मधून सहज ‘माजे रानी माजे मोगा’ गाणं वाजलं. आणि मनावर लख्खकन वीज चमकून पडावी असं झालं. गाडीत आम्ही दोघीच जणी राहिलेलो होतो. ड्रायव्हिंग करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला मी विचारलं, जगातली सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती? तिने सांगितलं, अपुरं राहिलेलं प्रेम याच्यासारखं वेदनादायी जगात दुसरं काही नाही. ज्याच्यावर सर्वात जास्त गाणी लिहिली गेली आहेत अशी गोष्ट कोणती असेल गं? माझा पुढचा प्रश्न...अपुरं राहिलेलं प्रेम! आम्ही दोघीही उद्गारलो. आम्ही दोघीही साहित्य, संगीत दोन्ही गोष्टींच्या प्रचंड शौकीन. त्यामुळे महानंदा ही कादंबरी आम्ही जोडीने वाचलेली होती. त्यानंतर पिक्चरसुद्धा आम्ही दोघींनी बसून एका बैठकीत पाहिलेला होता. त्या पिक्चर मधले सीन असे डोळ्यासमोर फिरायला लागले आणि जीव अक्षरश: घाबरा झाला. जी गोष्ट ज्या वेळेला हवी ती त्यावेळेला नाही मिळाली तर मग आयुष्य शून्य होत होऊन जातं. आयुष्याचा एक टप्पा ओलांडल्यानंतर ती गोष्ट पदरात येऊन पडली तरी मग काही उपयोग नसतो. आयुष्यातली इतकी मोठी भयाण पोकळी, प्रेमभंग झालेली लोकं कशी काय जगतात हा प्रश्न आजही माझं मन कुरतडत राहतो. महानंदाची कथा अशीच आहे. अर्थात ती आपल्या मनाला जी भिडते ती त्याच्या गाण्यामुळे. कथा जितकी ताकदवान आहे तितकीच गाणीही फारच सुंदर आहेत. आणि एक एक गाणं ऐकताना का कोण जाणे पण काळजात बारीक बारीक कळ येत राहते. का ते कळत नाही. कधीतरी ती हवीहवीशी वाटते कधी कधी ती असह्य होते.
महानंदा मधलं ऑल टाईम हिट अँड फेव्हरेट गाणं म्हणजे ‘माजे रानी माजे मोगा’. लता दीदी आणि सुरेश वाडकर या दोघांनी गायलेले युगुलगीत थोडासा वेस्टर्न संगीताचा टच आणि स्वररचनेत अतिविलक्षण गोडवा! हे गाणं काही केल्या मनातून जातच नाही! कोकणी बोलीभाषेचा गंध एकसारखा दरवळत राहतो या गाण्यात! त्या गाण्याअगोदरचा सीनही मोठा भावस्पर्शी आहे. बाबुल आणि मानू यांच्या आणाभाका होतात. आईने विरोध केला तर तुम्ही सांगाल तशी, तिथे, तेव्हा पळून येईन असं म्हणून आवेगाने ती त्याला बिलगते. आणि मग पुढे हे गाणं आहे. प्रेमात आपलं सर्वस्व वाहून आपलं सर्वस्व विसरलेले दोन जीव इतके सुंदर दिसतात, त्यांचे संवाद इतके मधुर असतात, की गाण्यापेक्षाही ते बोलणं गोड असतं. म्हणावं तर चोरून आणि म्हटलं तर जाहीर अशी ती दोघे भेटत असतात. त्याचं कारण मानू ही भाविणीची पोर असते. म्हणून तिच्याकडे कोणाही माणसाने जाणं हे समाजमान्य असतं. पण लग्न करायचं म्हटल्यावर मात्र देवधर्म आणि समाजरीती त्याला आडव्या येतात. एखाद्या स्त्राrच्या अस्तित्वाचा तिच्या गरिमेचा एवढा मोठा अपमान देवाधर्माच्या नावाखाली राजरोसपणे चालू राहतो ही सल कुठेतरी खोलवर आपल्या मनाला येऊन लागते. त्यांचे ते गोड प्रणयप्रसंग जितके अप्रतिम रंगवले आहेत त्यापेक्षाही जास्त झोंबतं ते त्यातलं विरहवास्तव. मुळात प्रेम, प्रणय आणि स्त्राr-पुरुष संबंध या गोष्टीला अतिशय नाजूक अलवार अनेकरंगी छटा असतात, हेच आजकालच्या काळात आपण विसरलो आहोत की काय असं वाटतं. या किंवा अशा क्लासिक सिनेमांमध्ये हे प्रसंग कमालीच्या हळुवारपणे अतितलमतेने दाखवले गेले आहेत. आणि त्या सगळ्याच सारसर्वस्व म्हणजे हे गाणं. इथे नुसती बोली कोकणी नाही तर त्याच्यामध्ये प्रतिमा ज्या आहेत त्याही अस्सल कोकणी आहेत त्या गाण्याचे म्युझिक पीसेस वेस्टर्न टच आहेत. आणि मूळच्या अस्सल कोकणी असणाऱ्या दोन्ही गायक कलाकारांनी जीव ओतून त्या गाण्याचं कोकणीपण रंगवलंय.
तुझ्या छातीर ठेवता माथा
फुलाभाशेन भाशेन हलकी दुखा आणि
तुजे भितूर माजे मना
दर्यावैल्या किरणाचो भाव
या ओळी म्हणजे त्या गाण्याच्या देखणेपणाचा कळस आहे. काय प्रतिमासौंदर्य आहे हे! तुझ्या छातीवर डोकं टेकवल्यावर मला माझी सगळीच्या सगळी दु:खं फुलांसारखी हलकी भासतात. इथे भाविणीची मुलगी म्हटल्यानंतर सतत फुलांचं साहचर्य आलंच. कोकणी बायकांना फुलांचा सोस असतो हेही खरंच. पण भावणीच्या जन्माची साथीदार म्हणजे ती फुलं. तिच्याबरोबरच उमलतात, तिच्या आंबाड्यात खुलतात, तिच्यासोबतच शेजेवरच चुरगळतात. आणि तिचं दु:ख तर महाभयंकर असतं. कारण तिच्या फुलांना फळं धरत नसतात आणि फळांतून बी रुजण्याचं भाग्य तिला लाभत नसतं. पण तरुण वय, सौंदर्य आणि समोर सुसंस्कृत तरुण, हे सगळं प्रेमात पडायला पुरेसं असतं.
पण नेहमीप्रमाणेच त्यांच्या प्रेमाला भयंकर विरहाचा शाप असतो. षडयंत्र करून त्या दोघांच्या मध्ये विष कालवून दिलं जातं. बाबुल मानूला कायमचा अंतरून शेवटी अविवाहित राहतो. आणि जत्रेच्या रात्री बाबुल आणि मानू जे जवळ आलेले असतात त्यातून एक अतिशय सुंदर, गोड असं फूल उमलतं. उध्वस्त झालेला बाबुल वीस वर्षानंतर जेव्हा गावी येतो तेव्हा फार मोठी उलथापालथ घडून गेलेली असते. त्या मूळ कादंबरीचा शेवट या वाक्याने आहे, की ‘आणि बाबा म्हणायचं हं!’ आणि इथेच किंचित का होईना आपण सुखावतो की फुलाचा सुगंध जरी घेता आला नाही तरी बीज मात्र रुजून आलं. पण ते प्रेम, ती अभिव्यक्ती, ते सहजीवन, ती स्वप्नं, सारं सारं राहून जातं. अपार प्रेम ज्या वेळेला वास्तवाच्या आचेत आटून जळून खाक होतं ती वेदना संपतच नाही. प्रेमात पडलेला माणूस किती उमेदीने स्वप्न रंगवतो त्याचं आयुष्य किती सुंदर असतं! दोन प्रेमी जीवांचे संवाद हे जगातलं सर्वोच्च सुख असतं. या प्रेमाचं पुढे संसारात झालेलं रूपांतर हे सौंदर्याचं मूर्तिमंत स्वरूप असतं. अर्थातच हे प्रेम प्रगल्भ, सुसंस्कृत असतं हे गृहितक आहे. पण ज्या वेळेला सर्व काही योग्य असून सुद्धा दारुण विरहाचा कायमचा शाप या प्रेम या गोष्टीला लागलेला बघायला मिळतो. तेव्हा ही कादंबरी आहे किंवा हा सिनेमा आहे हे विसरून आपल्या जीवाची सुद्धा तडफड सुरू होते. दमयंतीला आपल्यासोबत घेऊन जाणारा बाबुल बघताना महानंदाचा झालेला आक्रोश हा आपला आक्रोश केव्हा होऊन जातो, तेच आपल्याला समजत नाही. त्यांच्या गाडीच्या मागे धावताना महानंदा नुसती गाडी पकडत नसते. ती गेलेली वर्ष पकडत असते. करायचं राहिलेलं प्रेम पकडत असते. जगायचं राहिलेलं सहजीवन पकडत असते. सांगायच्या राहिलेल्या खूप खूप गोष्टी, भोगायचा राहिलेला आनंद, सगळ्या गोष्टी निसटून काचेसारख्याच खळ्ळदिशी वास्तव नावाच्या दगडावर आपटून फुटलेल्या असतात. आणि रक्तबंबाळ होऊन ती त्या आठवणींच्या काचा गोळा करीत असते. करीतच असते... आणि सूर ऐकू येत राहतात.
तुज्या ओठार सपना माजी
माजे गाणे गाणे होऊन येती
तुजे भितूर माजे मना
दर्यावैल्या किरणाचो भाव
माजे राजा माजे मोगा
तुजे नावाक जोडता नाव
अॅड. अपर्णा परांजपे प्रभु