माझी जात काढणे, हाच काँग्रेसचा एकमेक कार्यक्रम! पंतप्रधान मोदी यांचा आरोप
पंतप्रधान मोदी यांचे गुजरातमध्ये प्रतिपादन,
वृत्तसंस्था /अहमदाबाद
खेड्यांचा विकास घडवून शेतकऱ्यांच्या, विशेषत: छोट्या शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक योजना सफलतापूर्वक लागू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार खेड्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देत असून भारताला विकसीत राष्ट्र करायचे असेल, तर खेड्यांचा वेगाने विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते गुरुवारी गुजरात सहकारी दूध व्यापार महासंघाच्या रजतमहोत्सवी कार्यक्रमात भाषण करीत होते.
या कार्यक्रमासाठी अहमदाबादच्या मैदानावर 1 लाखांहून अधिक छोटे शेतकरी आणि पशुपालन व्यावसायिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना केंद्र सरकारच्या विविध शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली. देशभरात 10 हजारांहून अधिक शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याची केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांना निर्यातदार आणि कृषी उद्योजक बनविण्यासाठी ही योजना विशेषत्वाने लागू करण्यापत आली आहे. तिचा लाभ येत्या पाच ते सात वर्षांमध्ये लक्षावधी शेतकऱ्यांना होईल. ग्रामीण भागांमध्ये लघुएटीएम बसविण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना आणि छोट्या उद्योजकांना पैसे काढण्यासाठी दूरवरच्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता उरणार नाही. परिणामी, त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. पशुपालन करणाऱ्यांसाठी रुपे क्रेडिट कार्डस् वितरीत करण्यात येतील. प्रायोगिक तत्वावर यासाठी बनासकांठा आणि पंचमहाल जिल्ह्यांमध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
ग्रामीण विकासाला प्राधान्य
आम्हाला भारत एक विकसीत देश म्हणून नावारुपाला आणायचा आहे. त्यासाठी ग्रामीण विकासाचे सर्व पैलू आम्ही समाजावून घेतले असून त्यांना आमच्या धोरणांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. दुभत्या आणि पाळीव प्राण्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी योजना लागू करण्यात आली आहे. मधाच्या उत्पादनालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. शेतीसमवेतच असे व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. याच उद्देशाने शेतकऱ्यांच्यासमवेतच मत्स्यपालक आणि पशुपालकांनाही किसान व्रेडिट कार्डस् वितरीत करण्यात आली आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
सुधारित बियाण्यांचा पुरवठा
पर्यावरणीय परिवर्तनातही टिकाव धरतील अशा प्रकारची सुधारित बियाणी शेतकऱ्यांना पुरविण्यात येतील. लाळग्यासारख्या जीवघेण्या रोगापासून पाळीव प्राण्यांची सुरक्षा साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे अभियान हाती घेण्यात आले आहे. हे लसीकरण विनामूल्य आहे. यासाठी केंद्र सरकार 15 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. देशभारत किसान समृद्धी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. शेतीला आधुनिक विज्ञानाचे आधिष्ठान प्राप्त करुन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आवश्यक ते वैज्ञानिक सल्ले देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. शेतांमध्ये सौरऊर्जा केंद्रे स्थापन करणे आणि गोबर गॅस प्लँटस् बसविण्यासाठी साहाय्य करण्यासाठी योजना लागू करण्यात आल्या आहेत. अशा छोट्या पण व्यापक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास घडल्यानेच देशाचा मोठा विकास घडेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
400 जागांचे ध्येय गाठू
केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविणार असून आघाडीला 400 जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. काँग्रेस जितका माझा अपमान करेल, तेव्हढ्या अधिक मोठ्या प्रमाणात आम्ही विजयी होणार आहोत, याची काँग्रेसने पुरती जाण ठेवावी, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
काँग्रेसचा उद्योग जात काढण्याचा...
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली आहे. काँग्रेस अद्यापही जातीच्या जंजाळातून बाहेर पडून सकारात्मक विचार करण्याच्या मन:स्थितीत नाही. माझीही जात काँग्रेसचे नेते काढतात. त्यांचा अलिकडच्या काळात हा एकमेव कार्यक्रम झाला आहे. कारण त्यांना दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका करता येत नाही. माझ्या जातीचा अपमान करुन काँग्रेसने आपली मनोवृत्ती जनतेला दाखवून दिली आहे. याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी भाषणात केली.