हिंदूच्या घरात मुस्लीम, तर मुस्लिमाच्या घरात हिंदू मतदार?
मेरशीतील बामणवाड्यावरील अजब प्रकार
पणजी : मेरशी भागात बोगस मतदार असल्याच्या दावा काँग्रेसने केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित मामलेदारालाही पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती काँग्रेसचे पदाधिकारी जॉन नाझारेथ यांनी दिली आहे. काल गुरुवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जॉन नाझारेथ बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शमिल सिद्दकी व अॅडवीन वाझ उपस्थित होते. मेरशी गावातील बामणवाडा भागात बोगस मतदार मोठ्या संख्येने आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, याबाबत आम्ही तपासणी केली असता एका घराचा मालक मुस्लीम आहे, मात्र त्याच घर नंबरवर चार हिंदू मतदार असल्याचे दिसून येते. दुसऱ्या एका घराचा मालक हिंदू असून त्याच घर नंबरवर 3 मुस्लीम मतदार असल्याचे दिसून येते. एकूण साराच प्रकार हा बोगस मतदार असल्याचे दिसून येते आहे. याबाबत सखोल तपास होणे गरजेचे आहे. राज्यात दर निवडणुकीला बोगस मतदार मतदान करतात आणि चुकीच्या व्यक्तीला निवडून येण्याची संधी मिळते. हा सारा प्रकार थांबविण्यासाठी बोगस मतदार यादीतून वगळावे, अशी मागणी नाझारेथ यांनी केली आहे.