इस्रायलविरोधात मुस्लीम देशांची एकजूट
‘गाझा’ वाचविण्यासाठी धडपड : इराणचे राष्ट्राध्यक्ष सौदी अरेबियाला भेट देणार
वृत्तसंस्था/ रियाध, गाझा
गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांविरोधात मुस्लीम देश एकत्र येत आहेत. सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये गाझा मुद्यावर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनची (ओआयसी) बैठक होणार असून या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्षही सौदी अरेबियाला जाणार आहेत. काही काळापूर्वीपर्यंत इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे दिसत होते. मात्र चीनच्या मध्यस्थीनंतर सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी शनिवारी रियाधला जाणार आहेत. ओआयसीच्या बैठकीत गाझा संकटावर चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी इराणने आपल्या तज्ञांची एक टीम रियाधला पाठवली आहे. ही टीम परिषदेदरम्यान जारी करण्यात आलेल्या प्रस्तावाचे विश्लेषण करेल. ही बैठक विविध इस्लामिक देशांनी सुचविलेल्या प्रस्तावांवर आधारित असल्याची माहिती सौदी अरेबियातील इराणचे राजदूत अलीरेझा इनायती यांनी दिली.
गाझापट्टीत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अलीकडेच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांचीही भेट घेतली. याशिवाय इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही ब्रिक्स देशांना पत्र लिहून गाझा प्रश्नात हस्तक्षेप करून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच इस्रायलची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही इराणने केली आहे.
युद्ध थांबवण्याची मागणी
गाझापट्टीत सुरू असलेला संघर्ष त्वरित थांबवावा आणि इस्रायलने युद्धविराम करावा, अशी इस्लामिक देशांची मागणी आहे. मात्र, हमास ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 12,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे युद्धविरामाचे आवाहन
मुस्लीम देशांप्रमाणेच जगभरातून युद्धबंदीची मागणी होऊ लागली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही गाझामध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इस्रायली सरकार युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नाही. ओलिसांची सुटका होईपर्यंत युद्धविराम होणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. आपला देश गाझातील नागरिकांना वाचवण्यासाठी सर्व काही करत असताना हमास लोकांना सुरक्षित ठिकाणी जाऊ देत नाही. हमास लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे, असेही इस्रायली पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
बेंजामिन नेतन्याहू यांचे सडेतोड उत्तर
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदीच्या आवाहनावर नेतन्याहू यांनी, ‘जागतिक नेत्यांनी हमासवर नियंत्रण मिळवावे, इस्रायलवर नाही’ असे सांगत हमासने आज इस्रायलशी जे केले ते उद्या पॅरिस, न्यूयॉर्क किंवा जगात कुठेही होऊ शकते, असा इशारा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एका मुलाखतीदरम्यान गाझापट्टीमध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचेही त्यांनी समर्थन केले. त्याचवेळी गाझामधील अल शिफा हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हा हल्ला हमासच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.