मस्क 2 वर्षांत मंगळावर पाठविणार स्टारशिप
परीक्षण यशस्वी ठरल्यास मानवी मोहीम : 20 वर्षांत शहर वसविण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स पुढील 2 वर्षांमध्ये मंगळ ग्रहावर जगातील सर्वात शक्तिशाली स्टारशिप रॉकेट पाठविणार आहे. या प्रक्षेपणाचा उद्देश मार्सवर स्टारशिपच्या लँडिंगचे परीक्षण करणे असल्याची माहिती मस्क यांनी रविवारी ट्विट करत दिली आहे.
जर पहिली फ्लाइट आणि लँडिंग यशस्वी ठरले तर पुढील 4 वर्षांमध्ये मंगळ ग्रहावर आम्ही पहिला माणूस पाठविणार आहोत. त्यानंतर स्टारशिपला कमी कालावधीत मंगळावर पाठविले जाईल. पुढील 20 वर्षांमध्ये मंगळावर शहर वसविणे हे आमचे लक्ष्य आहे. एकाहून अधिक ग्रहांवर राहिल्याने जीवसृष्टी कायम ठेवण्याची शक्यता वाढणार आहे. एक ग्रहावरील जीवसृष्टी संपुष्टात येण्याचा धोका यापुढे नसेल असा दावा मस्क यांनी केला आहे.
जून महिन्यात यशस्वी परीक्षण
पुढील 5 वर्षांमध्ये मानवरहित स्टारशिपला मंगळावर उतरविले जाईल. यानंतर आणखी दोन वर्षांमध्ये मंगळावर आम्ही माणसांना पाठविणार आहोत असे मस्क यांनी मार्च महिन्यात म्हटले होते. मग स्टारशिपचे प्रक्षेपण 3 वेळा अयशस्वी ठरले होते. जून महिन्यात स्टारशिप रॉकेटचे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. यादरम्यान स्टारशिपला अंतराळात नेल्यावर परत पृथ्वीवर आणले गेले होते आणि हिंदी महासागरात यशस्वीपणे लँडिंग करविण्यात आले होते. स्टारशिप पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना टिकू शकते की नाही हा या परीक्षणाचा उद्देश होता.
पूर्णपणे पुनर्वापरक्षम
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने स्टारशिप रॉकेटची निर्मिती केली आहे. स्टारशिप अंतराळयान आणि सुपर हेवी बुस्टरला एकूणच ‘स्टारशिप’ म्हटले जाते. या प्रक्षेपकाची उंची 397 फूट आहे. हा प्रक्षेपक पूर्णपणे पुनर्वापरक्षम असून 150 मेट्रिक टन भार वाहून नेण्यास सक्षम आहे. स्टारशिप सिस्टीम 100 लोकांना एकाचवेळी मंगळ ग्रहावर नेऊ शकणार आहे.
माणसांना मंगळावर पोहोचविणार
स्टारशिपचे हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे, कारण हेच अंतराळयान माणसांना इंटरप्लेनेटरी स्वरुप प्राप्त करून देणार आहे. म्हणजेच याच्या मदतीने पहिल्यांदाच कुठलाही माणूस पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कुठल्याही ग्रहावर पाऊल ठेवणार आहे. मस्क 2029पर्यंत माणसांना मंगळ ग्रहावर पोहोचवून तेथे मानवी वस्ती स्थापन करू इच्छितात. पृथ्वीवर एक लाइफ एंडिंग इव्हेंट मानवतेच्या अंताचे कारण ठरू शकते, परंतु आम्ही मंगळ ग्रहावर वस्ती निर्माण केली तर माणसांचे अस्तित्व कायम राहू शकते असे मस्क यांचे म्हणणे आहे.