मस्क साकारणार स्वत:चे शहर
श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांची इच्छा स्वत:चे शहर निर्माण करण्याची आहे. अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मस्क यांना भरातीय वंशाच्या विवेक रामस्वामी यांच्यासह आपल्या भावी प्रशासनात एक मोठे उत्तरदायित्व सोपविण्याची घोषणा केली आहे. आधीपासून चर्चेत असणारे हे उद्योगपती त्यामुळे अधिकच नावारुपाला आले आहेत. सर्वसामान्य नागरीकांनाही अंतराळ प्रवास घडविण्याची त्यांची योजना असून या योजनेचीही चर्चा सर्वत्र होत असते.
मस्क यांच्या अंतराळ भ्रमण कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात आहे. या प्रांतातील कॅमेरॉन परगाण्यात मस्क यांनी आपल्या कंपनीच्या मुख्यालयाचे रुपांतर एका मोठ्या आणि अत्याधुनिक शहरात करण्याची महत्वाकांक्षी योजना मनात धरली आहे. नुकतेच त्यांनी या योजनेसंबंधीचे आवेदनपत्र टेक्सास प्रांताच्या गव्हर्नरांकडे अनुमतीसाठी पाठविले आहे. मस्क यांच्या स्वप्नातील हे शहर निश्चितच अन्य शहरांपेक्षा भिन्न असेल. भविष्यकाळात अंतराळ प्रवास हा एक आकर्षक व्यापारी व्यवसाय म्हणून नावारुपाला येणार, अशी त्यांची शाश्वती आहे. त्यामुळे आपल्या ‘स्पेसएक्स’ या अंतराळ कंपनीचा त्यांना विस्तार करायचा आहे. यासाठी त्यांनी एक शहरच स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना मनावर घेतली आहे. काही दिवसांपूर्वी यांनी सोशल मिडियावर या शहरनिर्मिती संकल्पनेला चालना दिली होती. अनेकांनी त्यांच्या या संकल्पनेचे स्वागत केले. अर्थातच या संकल्पनेचे विरोधकही आहेत. त्यांनी काही काळापूर्वी मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीवर पर्यावरणाला धोका निर्माण करण्याचा आरोप केला होता. तथापि, या सर्व विरोधांना डावलून आपली महत्वाकांक्षा ते साकारणार आहेत. स्पेसएक्सच्या संदर्भात न्यायालयात एक दावाही सादर करण्यात आला असून तोही एक अडथळा त्यांच्या मार्गात निर्माण झाला आहे. मात्र, आपण हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. अशा प्रकारे मस्क यांच्या स्वप्नातील या शहरासंबंधी आतापासूनच वाद निर्माण झाला असला, तरी सर्वसामान्यांमध्ये एक मोठे आकर्षण या संभाव्य शहरासंबंधी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.