ख्रिसमस मार्केटमध्ये हल्ला, जर्मनीत पाच ठार
200 हून अधिक जण जखमी : गर्दीत घुसवली कार
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये शनिवारी एका व्यक्तीने गर्दीमध्ये कार घुसवत मोठा हल्ला केला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 200 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपी हा 50 वर्षीय सौदी अरेबियाचा डॉक्टर असून तो जर्मनीच्या पूर्वेकडील सॅक्सनी-अनहॉल्ट राज्यात राहतो. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हल्लेखोर आरोपी सौदी अरेबियाचा नागरिक असून तो 2006 पासून जर्मनीमध्ये राहत असल्याचे मॅग्डेबर्गचे प्रीमियर रेनर हॅसलहॉफ यांनी सांगितले. हा हल्ला देशासाठी आणि शहरासाठी आपत्ती आहे. तथापि, हल्लेखोराचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली असतानाच झालेल्या या हल्ल्याने देशात खळबळ निर्माण झाली आहे.