ओंकार दादरकर यांच्या गायनाने संगीतरसिक मंत्रमुग्ध
आर्ट्स सर्कलतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
आर्ट्स सर्कलतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ या सुरेल कार्यक्रमात गायक कलाकार ओंकार दादरकर यांच्या भावपूर्ण गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तबल्यावर अंगद देसाई व संवादिनीवर सारंग कुलकर्णी यांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष लता कित्तूर, आकाश पंडित आणि रोहिणी गणपुले यांनी कलाकारांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात राग बिभास (शुद्ध धैवताचा) मधील विलंबित तिलवाड्यातील ख्यालाने झाली. त्यानंतर द्रुत तीनतालातील एक बंदिश त्यांची सादर केली. त्यानंतर ओंकार यांनी राग देसी आणि एक भावस्पर्शी भजन सादर केले.
मध्यंतरात उपस्थितांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यंतरानंतर ओंकार दादरकर यांनी राग तोडीमधील विलंबित झुमऱ्यातील ख्याल आणि एक द्रुत सादर केली. त्यानंतर ‘युवति मना दारुण रण’ हे नाट्यागीत त्यांनी सादर केले. कार्यक्रमाची सांगता राग भैरवीमधील ‘शिव के मन शरण हो’ या भक्तिगीताने झाली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक कुलकर्णी यांनी केले. व्यासपीठ सजावट आसावरी भोकरे यांनी आकर्षकपणे केली होती. सुमारे 400 संगीतरसिकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती.