पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ यांचे नाव आघाडीवर
कोल्हापूर :
विधानसभा निवडणूक निकालानंतर कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री कोण होणार ? याची चर्चा जोर धरू लागली आहे . मात्र कोल्हापूर जिह्यात सर्व समावेशक नाव म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे .मुंबईत तशा हालचाली सुरू झाल्याचे समजत आहे. हसन मुश्रीफ हे जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत .कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा ते निवडून आले आहेत .
त्यांनी अनेक खात्याचे मंत्रीपदे व जिह्याचे पालकमंत्री पद ही भूषविली आहे. जिह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद या ठिकाणी हसन मुश्रीफांचे प्राबल्य आहे . त्यामुळे त्यांच्याकडे जिह्यातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे .
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले नेते हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहावेळा विजयी झाले आहेत. अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ख्याती आहे. विकासकामांच्या जोरावर त्यांनी जिह्यात नावलौकीक मिळवला आहे. मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. तसेच मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्रातही विशेष योगदान दिले आहे.
पुढील काही दिवसात जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत . या निवडणुकीत महायुतीला यश प्राप्त करून देण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे . मंत्री हसन मुश्रीफ व भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक हे येत्या काळात जिह्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील .
जिह्यातील महायुतीच्या नेते मंडळींना एकसंघपणे घेऊन जाण्याची क्षमता हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आहे .त्यांच्या सोबतीला खासदार धनंजय महाडिक महायुतीचे नेतृत्व करतील .आमदार प्रकाश आबीटकर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे .