मुशीरखानची प्रकृती स्थीर
वृत्तसंस्था/ लखनौ
मुंबई क्रिकेट संघातील अष्टपैलू मुशीरखान याला मोटार अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. या दुखापतीमुळे तो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी करंडक सामन्यात खेळू शकणार नाही. मुंबई संघातील फलंदाज सर्फराज खान याचा मुशीरखान हा लहान भाऊ आहे.
इराणी करंडक सामन्यासाठी मुंबईत तो आपल्या वडिलांसमवेत मोटारीतून लखनौ येथून येत असताना महामार्गावर त्याच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्या मानेच्या हाडाला दुखापत झाली असून तातडीने त्याच्यावर रुग्णालयात वैद्यकीय इलाज सुरू आहे. या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त राहण्यासाठी त्याला किमान तीन महिने विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट हंगामातील बऱ्याच सामन्यात तो खेळू शकणार नाही. मुंबई हा विद्यमान रणजी चषक विजेता असून त्यांचा इराणी करंडक सामना शेष भारत संघाबरोबर लखनौच्या वाजपेयी स्टेडियममध्ये 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळविला जाणार आहे.