टेनिस संघटनेची निवडणूक बिनविरोध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय टेनिस संघटनेची नव्या पदाधिकाऱ्यांसाठीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा शनिवारी येथे संघटनेच्या प्रवक्त्याने केली. दरम्यान निवड झालेल्या नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आली नाही.
शनिवारी येथे अखिल भारतीय टेनिस संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली आणि या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. आता या संघटनेला नवा अध्यक्ष, नवा खजिनदार आणि नवा सचीव लाभणार आहे. या निवडणुकीमध्ये 8 उपाध्यक्षांची तसेच 4 संयुक्त सचीव आणि 10 कार्यकारी सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदासाठी सुरूवातीला रोहित राजपाल आणि अन्य एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यानंतर भारताच्या डेव्हिस चषक संघाचा बहिस्थ कर्णधार रोहित राजपालने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या प्रकरणाची सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतरच संघटनेच्या नवा पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल.