मृतदेहांचे प्रदर्शन करणारे संग्रहालय
अमेरिकेत एक असे संग्रहालय आहे, जेथे मानवी मृतदेहांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. मृतदेहांना अनेक वर्षांपर्यंत संरक्षित करून ठेवले जाते आणि प्रदर्शनात शरीराच्या विविध अवयवांना दाखविले जाते. या संग्रहालयात मृतदेहांचे प्रदर्शन पाहण्यासाठी पोहोचलेल्या एका महिलेला स्वत:च्या मुलाचा मृतदेहही डिस्प्लेमध्ये दिसून आला. किम एरिक या महिलेचा पुत्र क्रिसने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आपल्या मुलाचे अवशेष लास वेगासच्या लाइव बॉडीज संग्रहालयात असल्याचे या महिलेचे सांगणे आहे.
54 वर्षीय किम एरिक लास वेगासमध्ये रियल बॉडीज प्रदर्शनात गेली असता तिला एक मृतदेह दिसून आला, हा मृतदेह स्वत:च्या मुलाचा असल्याचे तिचे सांगणे आहे. या मृतदेहावरील त्वचा काढण्यात आली होती आणि शरीरातील अवयव पाहता यावेत म्हणून तो अनेक ठिकाणी कापण्यात आला होता.
फेटाळला दावा
परंतु किम यांच्या पुत्राचा मृतदेह येथे नसल्याचा दावा संग्रहालयाने केला आहे. किम यांचा पुत्र क्रिस यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात आली असून त्याने आत्महत्याच केली होती, असे पोलिसांचे सांगणे आहे. तर किमचा मृत्यू आणि संग्रहालयात त्याच्या मृतदेहाचे अवशेष असण्यामागे काहीतरी रहस्य दडलेले असल्याचा दावा किम यांचा आहे. संग्रहालयातच त्याचा मृतदेह असल्याचे मला माहित होते. हे पाहणे अविश्वसनीय स्वरुपात वेदनादायी होते. या प्रकारामुळे मला आणि माझ्या परिवाराला कितपत हादरविले हे मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. प्रत्यक्षात स्वत:च्या मुलाचा विद्रुप मृतदेह पाहत होते असा दावा टेक्सास येथील रहिवासी किमने केला आहे.
चीनमधुन आणले जातात मृतदेह
आता किम मृतदेहाच्या डीएनए परीक्षणाची मागणी करत आहे. तसेच क्यूरेटरला तिने अवशेष देण्याचे आवाहन केले आहे. मृतदेह चीनमधून आणले होते आणि मृतदेहांची ओळख पटविण्याची कुठलीच स्पष्ट पद्धत नसल्याचे प्रदर्शनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
2004 पासून प्रदर्शन
रियल बॉडीजची मालकी असलेल्या इमेजिन एक्झिबिशन्स इंकने एक वक्तव्य जारी करत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही परिवाराबद्दल स्वत:च्या संवेदना व्यक्त करतो, परंतु या आरोपांना कुठलाच तथ्यात्मक आधार नाही, ज्या नमुन्याचा उल्लेख करण्यात आला, तो 2004 पासून लास वेगासमध्ये प्रदर्शित होत आहे आणि या दाव्यांमध्ये नाव असलेल्या व्यक्तीशी याचा कुठलाच संबंध नाही. सर्व नमुने नैतिक स्वरुपात प्राप्त करण्यात आले आणि जैविक स्वरुपात ओळख पटविण्यायोग्य नाहीत. प्रदर्शन उच्च नैतिक आणि कायदेशीर मापदंडांची पूर्तता करतील हे सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत असे कंपनीने म्हटले.
2012 मध्ये मृत्यू
नोव्हेंबर 2012 मध्ये क्रिस घरात मृत आढळून आला होता. अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्युची चौकशी केली होती. हृदयविकाराचे दोन धक्के बसल्यावर झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे किमला सांगण्यात आले होते.
केस पुन्हा खुली
किम याप्रकरणी संतुष्ट नसल्याने पोलिसांना तिने पुन्हा केस खुली करण्याची विनंती केली. काही आठवड्यांनी तिला त्याच्या शरीराची छायाचित्रे पाठविण्यात आली, छायाचित्रे अत्यंत विचलित करणारी होती. क्रिसच्या हात, छाती आणि पोटांवर कशाने तरी बांधण्यात आल्याच्या खुणा होत्या असा दावा किम यांनी केला. किमने चौकशीसाठी दबाव कायम ठेवला आणि एका फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरात सायनाइडचे घातक प्रमाण होते असे नमूद करण्यात आले.
आत्महत्या घोषित
2014 मध्ये एका ज्यूरीने क्रिसच्या मृत्यूची चौकशी केली, परंतु अखेरपर्यंत हत्येची पुष्टी करणारा कुठलाच पुरावा मिळाला नाही आणि अखेर त्याच्या मृत्यूला आत्महत्या मानण्यात आले. परंतु कुणीतरी आपल्या मुलाची हत्या केली असल्याचा किम यांचा दावा आहे.
रियल बॉडीज म्युझियम
किमच्या दाव्यानुसार तिने म्युझियमध्ये जात स्वत:च्या मुलाचा मृतदेह डिस्प्लेमध्ये पाहिला. लास वेगासमध्ये रियल बॉडीज प्रदर्शन आयोजित होत असून तेथे मानवी शरीरांना पूर्णपणे संरक्षित करून दाखविले जाते. जेणेकरून शरीरात काय आहे हे लोकांना पाहता येईल.