मुर्डेश्वर पर्यटकावरील बंदी उठविली
केवळ एक तासात हजारो पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दाखल : पोलिसांची संख्या वाढविली
कारवार : संपूर्ण देशातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र आणि पर्यटनस्थळ मुर्डेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकावर घातलेली बंदी 21 दिवसानंतर उठविण्यात आली. बंदी उठविल्यानंतर केवळ एक तासात हजारो पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाल्याची घटना काल बुधवारी संध्याकाळी घडली. 10 डिसेंबर रोजी कोलार जिल्ह्यात चार शालेय विद्यार्थिनींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या किनाऱ्यावरील प्रवेशावर बंद घातली होती. ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाही बंदी उठविण्यात आली नव्हती. त्यामुळे लाखो पर्यटक निराश होऊन परतले होते. तथापि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने पर्यटकांना गोड बातमी दिली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या सुरक्षितता उपायांची खात्री पटल्यानंतर समुद्रकिनारा खुला केला आहे.
समुद्र किनाऱ्यावर आता स्वीमिंग डेंजर आणि पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहे. स्वीमिंग आणि डेंजर झोन निश्चित करण्यासाठी दोर बांधण्यात आले आहेत. पर्यटकांना आता केवळ स्वीमिंग झोनमध्ये पोहण्याचा आनंद लुटता येणार आहे. किनाऱ्यावरील सुमारे 70 टपऱ्या हटवून कार आणि अन्य वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. किनाऱ्यावर जीव रक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे. पर्यटकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीची पर्यटकांवर नजर राहणार
याशिवाय स्पीड बोट्स ऑक्सिजन किट्स, विशेष जीवरक्षक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. सायरन, टॉवरवॉचची व्यवस्था करण्यात आली आहे. 24×7 सीसीटीव्हीची पर्यटकांवर नजर राहणार आहे. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील बंदी उठविण्यात आली आहे.