मांद्रेत महेश कोनाडकरवर खुनी हल्ला
‘’तुला मायकल हवाय?” म्हणत केले सळीने वार : हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसस्थानकावर धडक
पेडणे : “तुला मायकल लोबो हवा?” असे विचारत आणि शिवीगाळ करत पाच अज्ञातांनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी सकाळी आस्कावाडा-मांद्रे मठाजवळ जीवघेणा हल्ला केला. जखमी कोनाडकर यांना तातडीने तुये इस्पितळात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मांद्रेत खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांना 24 तासांत अटक करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरत पोलिसस्थानकावर धडक दिली. याप्रकरणी मांद्रेचे निरीक्षक शेरीफ जॅकिस यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
राजकीय हेतुने हल्ला?
मांद्रे येथील प्रसिद्ध सप्ताहाला आमदार मायकल लोबो आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी सरपंच महेश कोनाडकर व प्रशांत ऊर्फ बाळा नाईक हे त्यांच्यासोबत उपस्थित होते होते. त्याचवेळी काही पत्रकारांनी लोंबोंना तुम्ही आगामी विधानसभेसाठी मांद्रेतून इच्छुक आहात का, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर कळंगुटचे आमदार असलेले लोबो अधूनमधून मांद्रे मतदारसंघात येतच असतात. काही नागरिक त्यांना जाऊन भेटतात आणि आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडतात. त्यामुळे गेले काही दिवस मतदारसंघात उलटसुलट राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. या राजकीय वातावरणातूनच कोनाडकर यांच्यावर हल्ला झाल्याच्या चर्चेस काल बुधवारी दिवसभर ऊत आला आहे. देवेंद्र प्रभुदेसाई, अॅड. अमित सावंत यांनी हल्ल्याचा निषेध करत 24 तासांच्या आत संशयितांना अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा व हल्ल्यामागचा मास्टरमाईंडही शोधावा. अन्यथा 24 तासांनंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
कोणी सुपारी दिली ते शोधा : लोबो
तोंडावर मास्क घालून आलेल्या पाचजणांनी कोनाडकर यांच्यावर दिवसाढवळा हा खूनी हल्ला केला. पोलिस प्रशासनाने तातडीने तपास करून संबंधितांना ताब्यात घ्यावे, तसेच या पाच जणांना हल्ल्याची सुपारी कोणी दिली याचा शोध देखील घ्यावा, अशी मागणी लोबो यांनी केली आहे.
दयानंद सोपटेंचा आरोलकरांवर आरोप
कोनाडकरांवर हल्ला होणे ही दुर्दैवी घटना आहे. या हल्ल्याच्या पाठिमागे कोणाचा हात आहे हे सर्वांना माहीत आहे. गेल्या दोन वर्षांत मांदे मतदारसंघात दादागिरी वाढल्याचे सांगत माजी आमदार दयानंद सोपटे यांनी या हल्ल्यात विद्यमान आमदार जीत आरोलकर यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.
आमदार आरोलकरांनी केला निषेध
आमदार जीत आरोलकर यांनी कोनाडकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना माझ्या मतदारसंघात खपवून घेणार नाही. काहीजण उगाच राजकीय संबंध लावू पाहतात. कोनाडकर यांच्याशी माझो संबंध चांगले आहेत. हल्ल्याच्या घटनेबाबत आपण मुख्यमंत्री कार्यालयाशीही बोललो आहे. पोलिसांनी तपास करून गुन्हेगारांना पकडाचे. आपण पोलिसांशीही बोललो आहे. कोनाडकर यांना न्याय मिळेल एवढे आपण सांगतो. जोपर्यंत हल्लेखोर पकडले जात नाहीत तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाहीं. आपण हल्ल्याचा निषेध करतो, असे आरोलकर म्हणाले. यावेळी उपसरपंच तारा हडफडकर म्हणाल्या की आजपर्यंत मतदारसंघात अशा प्रकारची घटना कधी घडली नाही. आम्ही सर्व पंच अशा कृतीचा निषेध करतो. अशा घटना आमच्या मतदारसंघात आणि पंचायत क्षेत्रात घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी. तसेच या हल्ल्यात जे सहभागी आहेत, त्यांचा तपास तातडीने करून त्यांना अटक करावी. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही महेश कोनाडकर यांची भेट घेऊन या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
निरीक्षकाची बदली केली,तरीही प्रकरण मिटणार नाही
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जो कोणी खुनी हल्ला केलेला आहे, त्या हल्लेखोरांना 24 तासाच्या आत अटक करावी. अन्यथा कायदा सुव्यवस्था जनतेकडून बिघडली आणि एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला सरकार व पोलिस जबाबदार असतील. केवळ मांद्रे पोलिसस्थानकाचे निरीक्षकाची तातडीने बदली करून हे प्रकरण मिटणार नाही. असे निवेदन स्थानिक नागरिकांनी मांद्रे पोलिसस्थानकावर धडक देऊन निरीक्षक नारायण चिमुलकर यांना निवेदन सादर केले. मांद्रे पोलिसांनी माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावरील खुनी हल्ल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 352, 118(1) 26 (2) 324 (2 ) या कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या मांद्रेचे निरीक्षक शेरीफ जॅकिस यांची बदली केल्यानंतर तात्पुरता मोपाचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
माजी सरपंच अमित सावंत यांनी सांगितले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सायंकाळी माजी आमदार सोपटे, आमदार मायकल लोबो यांच्यामार्फत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मांद्रे पोलिसस्थानकाचे निरीक्षक शेरीफ जेकस यांची तातडीने बदली केली. परंतु बदली करून हे प्रकरण मिटणार नाही. खुनी हल्लेखोरांचा शोध घेऊन 24 तासाच्या आत त्यांना अटक करावी. महेश कोनाडकर यांच्यावर ज्यांनी हल्ला केलाय त्या गुन्हेगारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी केली. माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी सांगितले की अशा प्रकारचे प्रकरण मांद्रे गावात प्रथमच घडवले गेले आहे. एका माजी सरपंचावर आणि विद्यमान पंचावर खुनी हल्ला करणारे कोण गुन्हेगार आहेत? मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी गृह खात्याअंतर्गत त्वरित चौकशी करावी, अशी मागणी केली.