काँग्रेसचा राजधानीत मोर्चा
वाढता भ्रष्टाचार, गुन्हेगारी : डॉ. आंबेडकर अवमानप्रकरणी सरकारवर टीका
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील वाढता भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा सुरक्षा व्यवस्था तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी काँग्रेसने शनिवारी सकाळी राजधानीत मोर्चा काढला. सरकार विरोधात घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यांच्या आल्तिन येथील निवासस्थानावर जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आझाद मैदान आणि पोलिस मुख्यालय याच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर अडविले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅल्टन डिकॉस्ता, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सुनिल कवठणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती परवानगी
येथील काँग्रेस कार्यालय ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शांततेत मोर्चा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. काही दिवसांपूर्वी भाजपने काढलेल्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आणि काँग्रेसला नाकारण्यात आल्याने पोलिसांच्या या कारभाराबाबत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सरकार हुकूमशाही करत आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले. परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. तिसवाडी मामलेदारांनी घटनास्थळी येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरीही रस्त्यावर ठाण मांडून त्यांनी मोर्चा सुऊच ठेवला होता. अखेर त्यांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा केला. मोर्चाच्यावेळी पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, बाबी बागकर, विजय भिके नारायण रेडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात घोटाळ्यांत वाढ : युरी आलेमाव
राज्यात आर्थिक घोटाळे वाढले आहेत. सरकारी नोकरी देण्यासाठी पैसे घेतले जात असून युवकांची फसवणूक केली जात आहे. खून प्रकरणे, जमीन घोटाळे प्रकरणेही वाढली असून सरकारला याचे काहीच पडलेले नाही. किंबहुना सरकारच या प्रकारात सहभागी आहे. कुविख्यात गुन्हेगाराला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास पोलिसच मदत करतात आणि नंतर तोच गुन्हेगार आपल्याला पळून जाण्यास कसे भाग पाडले तेही व्हिडिओद्वारे व्हायरल करतो याचाच अर्थ सरकारच या प्रकरणात सहभागी असल्याचे सिद्ध होत आहे. राज्यात दरडोई 3 लाखाहून अधिक कर्ज असताना मुख्यमंत्री आणि आमदार चार्टर विमानातून सफारी करतात जनतेच्या पैशाचा चुराडा केला जात आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : माणिकराव ठाकरे
राज्यातील कायदा व सुव्यस्था कोलमडली असून गोवा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. पोलिसांच्या माध्यमातून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्हेगारांना कोठडीतून सोडत आहेत. आम्ही शांततेत आंदोलन करणार असल्याचे सांगूनही परवानगी नाकारणे अयोग्य असल्याची टीकाही माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. सरकारच्या सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढत आहे. जमीन बळकावणाऱ्यांना सरकार आश्रय देत आहे. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.