अवघ्या चार तासात खुनी जेरबंद
भाटलेतील मजुराच्या खून प्रकरणी पणजी पोलिसांनी केली कारवाई
पणजी : भाटले पणजी येथील श्रीराम मंदिराच्या मागच्या बाजूस नव्यानेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सोमवारी रात्री एका मजुराचा खून करून पळालेल्या संशयिताला अवघ्या चार तासातच पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव अरविंद तिवारी (उत्तर प्रदेश) असे असून मयताचे नाव जॉन असे आहे. खुनाची घटना सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली होती.
पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि संशयिताचा शोध घेण्यास सुऊवात केली. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासून पाहिले असता संशयित तिवारी खून करून पळून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर आणखी एक फुटेज तपासली असता संशयित मळा येथे एका बसमध्ये चढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयित पणजी बसस्थानकावर गेला असल्याची पोलिसांची खात्री झाली. नंतर पोलिसांनी त्वरित बसस्थानक गाठले. मात्र बसस्थानकावरून गोव्याबाहेर जाणाऱ्या कुठल्याच प्रवासी बसमध्ये संशयित चढत असल्याचे दिसून आले नाही तेव्हा पोलिसांमोर प्रश्न उभा राहिला की संशयित नेमका गेला कुठे.
पोलिसांच्या हाकेला प्रतिसाद दिला अन् अडकला...
कुठल्याच प्रवासी बसमध्ये चढला नाही म्हणजे संशयित गोव्यात आहे, अशी खात्री पोलिसांची झाली आणि त्यांनी याबाबतची माहिती सर्व पोलिसस्थानकांना तसेच रेल्वे स्थानकांवर दिली. तसेच पणजी मार्केटमध्ये तसेच काही मोक्याच्या ठिकाणी संशयिताचा शोध घेणे सुरू केले. पोलिस योगसेतूजवळ पोचले असता तिथे एक व्यक्ती झोपलेली असल्याचे दिसून आले. त्याला अरविंद म्हणून हाक मारली असता त्याने प्रतिसाद दिला, तेव्हा पोलिसांना संशयिताची खात्री पटली. त्याला ताब्यात घेतले आणि खाकी हिसका दाखवून त्याची उलटतपासणी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले.
फोन टाकला फ्लाईट मोडवर
संशयित सराईत गुन्हेगार असून त्याने उत्तर प्रदेश येथे एकाचा खून करून पाच दिवसापूर्वी तो गोव्यात आला होता. गोव्यात खून केल्यानंतर पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी तो बसस्थानकावर जाऊन परत चालत योगसेतूपर्यंत आला होता. परत येताना त्याने आपला मोबाईल फ्लाईट मोडवर घातला होता. त्यामुळे त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
शिवी दिल्याने खुनी वृत्ती जागी झाली
मयत जॉन हा भंगार गोळा करीत होता. तसेच बांधकाम सुरू असलेल्या कामगारांसोबत राहत होता. अधूनमधून बांधकामाच्या ठिकाणीही काम करीत होता. संशयित गोव्यात आल्यानंतर बाजारात हमाली करीत होता आणि मिळेल त्या ठिकाणी झोपत होता. काही दिवसांनी त्याची जॉनबरोबर ओळख झाली आणि ते दोघेही बांधकामाच्या ठिकाणी राहू लागले आणि तेथेच काम करीत होते. खुनाची घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी दोघांनी जेवण तयार केले आणि दारू पित होते. याचवेळी क्षुल्लक कारणावरून त्यांची बाचाबाची झाली. दारूच्या नशेत असलेल्या जॉनने शिवीगाळ केली. संशयिताने आपणास शिव्या देऊ नकोस म्हणून सांगितले मात्र तो ऐकत नव्हता. तेव्हा संशयिताच्या अंगातील खुनी अरविंद जागा झाला आणि त्याने त्याच ठिकाणी असलेली सुरी जॉनच्या गळ्यावर ओढली आणि त्याचा खून केला, अशी माहिती संशयिताने उघड केली आहे.