अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक! आटपाडी पोलीसांची कारवाई
अकलुजमधुन घेतले ताब्यात: तीन दिवस कोठडी
आटपाडी प्रतिनिधी
शाळेतुन घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीतुन नेवुन तिच्या अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुख या नराधमाला आटपाडी पोलीसांनी अकलुजमधुन अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आटपाडीतुन शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या अल्पवयीन भोळसर मुलीला जबरदस्तीने गाडीतुन नेवुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली. अत्याचाराचे व्हिडीओ बनवुन पुन्हा चाकुचा धाक दाखवुन त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुख आणि या कृतीत त्याला साथ देणारी सुमित्रा लेंगरे यांच्याविरोधात आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी आटपाडी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संग्राम देशमुख(आटपाडी) व सुमित्रा लेंगरे(लेंगरेवाडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना संग्राम आणि सोबतची महिला सुमित्रा हिने जबरदस्तीने लाल रंगाच्या चारचाकी गाडीत बसविले. ही गाडी गावाबाहेर नेवुन गाडीतच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.
त्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ करून चाकुचा धाक दाखविला. तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकीही संग्रामने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर भिती दाखवुन पुन्हा गाडीतुन नेवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी पिडीत मुलीकडे चौकशी केली असता संपुर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला. त्यानंतर आटपाडी पोलीसात संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी सुरूवातील सुमित्रा लेंगरे हिला अटक केली. त्यानंतर फरार संग्रामच्या शोधासाठी यंत्रणा लावली. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश जाधव पथकाने संग्राम देशमुख याला सोलापुर जिल्ह्यातील अकलुज येथुन रात्रीच्यावेळी छापा टाकुन अटक केली. त्याच्या अटकेसह पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीदेखील हस्तगत केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि रमेश जाधव यांनी दिली.
अनेक काळे उद्योग...
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संग्राम देशमुख याने जीमच्या नावाखाली अनेक काळे उद्योग केल्याची चर्चा आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने अनेकांचे आक्षेपार्ह अश्लिल फोटो आणि व्हिडीओ त्याच्याकडे असल्याची चर्चा रंगली आहे. शिवाय खासगी सावकारीसह फसवणुकीच्या घटनांनाही तोंड फुटले आहे. पोलीस आत्ता त्याच्या कारनाम्यांचा शोध घेत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीतुन नेवुन अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुख आणि तिची साथीदार सुमित्रा लेंगरे यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीसांनी त्याची पाळेमुळे खणुन काढावीत, अशी मागणी होत आहे.