रायबाग येथील ‘त्या’ अपहृत वकिलाचा खून
आठ संशयितांना अटक, वकिलांचाही समावेश : जमिनीच्या वादाचे कारण
बेळगाव : संसुद्दी, ता. रायबाग येथील एका वकिलाचे अपहरण करून त्याचा भीषण खून केल्याच्या आरोपावरून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणातील आणखी दोघे जण फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही वकिलांचाही समावेश आहे. अॅड. संतोष अशोक पाटील (वय 33), राहणार संसुद्दी, ता. रायबाग असे खून झालेल्या दुर्दैवी वकिलाचे नाव आहे. 29 एप्रिल रोजी केए 23 ईव्ही 1541 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कोर्टाला जाण्याचे सांगून ते आपल्या घराबाहेर पडले होते. शाहू पार्क बसथांब्याजवळ रायबाग-कंकणवाडी रोडवर त्याच दिवशी सकाळी 10.45 वाजता त्यांची मोटारसायकल आढळून आली. मोबाईल व बॅगही तेथेच होती.
कुटुंबीयांनी रायबाग पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविली होती. अपहरणाचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. पत्नी रेखा संतोष पाटील यांनी फिर्याद दिली होती. रायबाग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. अपहरणानंतर जोयडा तालुक्यातील (जि. कारवार) गणेशगुडीजवळ तलवारीने वार करून अॅड. संतोष यांचा भीषण खून करण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला आहे. घटनास्थळावर पोलिसांनी हाडे जप्त केली असून डीएनए चाचणीत गणेशगुडीजवळ आढळलेली हाडे
अॅड. संतोष यांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांची धरपकड केली आहे. आणखी दोघे जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.शिवगौडा बसगौडा पाटील, भरत कोळी, राहणार बस्तवाड, ता. रायबाग, किरण केंपवाडे, राहणार बिरनाळ, ता. रायबाग, सुरेश भीमप्पा नंदी, राहणार चंदूर, ता. बेळगाव, उदय भीमाप्पा मुशण्णावर, राहणार गुजनाळ, संजयकुमार यल्लाप्पा हळबण्णावर, राहणार वन्नूर, ता. बैलहोंगल, रामू भीमप्पा दंडापुरे, राहणार गजमनाळ, मंजुनाथ बसवराज तळवार, अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. महावीर हंजे, राहणार अळगवाडी, नागराज परसाप्पा नायक, राहणार होनियाळ, ता. बेळगाव हे दोघे जण फरारी झाले आहेत.
गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रs, कार, मोटरसायकल, मोबाईल जप्त करण्यात आले असून सुपारी देऊन अॅड. संतोष पाटील यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. अॅड. शिवगौडा बसगौडा पाटील व संतोष पाटील या दोन वकिलांमध्ये रायबाग येथील 1 एकर 4 गुंठे मिळकतीविषयी वाद होता. सहा महिन्यांपूर्वी अॅड. संतोष यांनी रायबाग न्यायालयात शिवगौडा यांच्यावर दिवाणी खटलाही दाखल केला होता. त्यामुळे राग अनावर होऊन शिवगौडा यांनी काही वकील मित्रांच्या सहकार्याने मोटरसायकलवरून कोर्टाला येणाऱ्या अॅड. संतोष यांच्या मोटरसायकलला कार आडवी लावून त्यांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.