महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्माईल हानियाची हत्या

06:30 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकेकाळचा पॅलेस्टाईनचा प्रमुख आणि इस्रायल-हमास संघर्षाचा सूत्रधार इस्माईल हानिया याची इराणमध्ये त्याच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली आहे. सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटलेले आहे आणि ते ऑक्टोबर 2013 पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर ही हत्या एक महत्त्वाची घटना ठरते. हानिया हा कतार या देशात रहात होता. तेथून तो इस्रायलशी संघर्षाचे सूत्रसंचालन करीत होता. आपण सुरक्षित स्थानी आहोत आणि आपण काहीही केले तरी आपल्यापर्यंत पोहचून कोणी आपल्या जीवाला धोका करु शकत नाही अशी त्याची भावना होती. मात्र बुधवारी इराणच्या अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या विभागात त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या इस्रायलने केली की अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने, यावर सध्या बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलमध्ये ज्यू धर्माचा प्रमुख सण साजरा होत असताना हमासच्या अनेक दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अनेक निरपराध ज्यू नागरिकांचीही निर्घृण हत्या केली. महिलांवर क्रूर अत्याचार केले आणि 50 हून अधिक ज्यूंचे अपहरण करुन त्यांना पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत ओलीस ठेवले आहे. हमासच्या या मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवादी कृत्यामुळे सध्याचे युद्ध भडकले आहे. या युद्धात अद्याप कोणाचा निर्णायक विजय झाला नसला तरी पॅलेस्टाईनची अतोनात हानी झाली असून 10 हजारांहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक गाझा पट्टीत मृत्यूमुखी पडले आहेत. निर्विवादपणे 7 ऑक्टोबरचा हा दहशतवादी हल्लाच या युद्धाला कारणीभूत आहे. कारण तो झाला नसता, तर इस्रायलने स्वत:हून गाझा पट्टीवर आक्रमण केले नसते, ही बाब उघड आहे. आत्तापर्यंत इस्रायल आणि अरब देश यांच्यात जी युद्धे झाली, त्यांच्यात एकदाही इस्रायलने स्वत:हून आक्रमण केल्याचे दिसत नाही. या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रसंचालनही हानिया याने केल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. 62 वर्षांचा हानिया याचा जन्म गाझा पट्टीतील एका निर्वासित छावणीत 1962 मध्ये झाला होता. त्यावेळी गाझा पट्टीचे नियंत्रण ईजिप्तकडे होते. त्याचे आईवडील 1948 च्या इस्रायल-अरब युद्धकाळात पळून गाझापट्टीत आश्रयाला होते असे सांगितले जाते. आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी हानिया याने त्याच्या तरुण वयात काही काळ इस्रायलमध्ये काम केले होते. इस्रायलमध्ये त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हिंसक निदर्शनांमध्ये भाग घेतल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. 1992 मध्ये त्याची इतर अनेक नेत्यांसमवेत सुटका करण्यात आली आणि त्यांना लेबेनॉनमध्ये विजनवासात धाडण्यात आले. हमासची स्थापना झाल्यानंतर तो या संघटनेच्या संपर्कात आला आणि त्याने झपाट्याने आपली प्रगती आणि पदोन्नती करुन घेतली. या संघटनेचे संस्थापक अहमद यासीनही अनेक वर्षे इस्रायलच्या कारागृहात होते. 1997 मध्ये एका कराराअंतर्गत त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर हानिया याची नियुक्ती यासीन यांच्या मुख्यालयाचा प्रमुख म्हणून करण्यात आली. तेथून पुढे इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ले करण्याचे सत्र त्याने सुरुच ठेवले होते. 2003 मध्ये जेरुसलेम येथे त्याने बाँबस्फोट घडविला. इस्रायलनेही त्याला पकडण्याचे किंवा मारण्याचे प्रयत्न अनेकदा केले. अशाच एका संघर्षात तो जखमीही झाला होता. 2006 मध्ये पॅलेस्टाईनच्या निवडणुकीत हमास विजयी झाल्यानंतर त्याची पॅलेस्टाईनच्या प्रमुखपदी काही काळ नियुक्ती झाली. या घटनांच्या काहीकाळ आधी अमेरिकेने पॅलेस्टाईनवर आर्थिक निर्बंध घातले होते. ते उठविण्यासाठी हानिया याने अनेक प्रयत्न केले. तथापि, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी निर्बंध उठविण्यास नकार दिला होता. पॅलेस्टाईनच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांमध्येच अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशी त्याचे मतभेद झाले. अब्बास अमेरिका आणि इस्रायल यांच्या संदर्भात मवाळ आहेत असे त्याचे मत होते. पॅलेस्टाईनचा प्रमुख या नात्याने तो त्याच्या प्रथम विदेश दौऱ्यावरुन परतत असताना 2006 मध्ये त्याला गाझा पट्टीत प्रवेश नाकारण्यात आला. 2007 मध्ये त्याने प्रमुखपदाचा राजीनामा दिला. यावेळी पॅलेस्टाईनमधील दोन राजकीय प्रतिस्पर्धी संघटना फताह आणि हमास यांच्यात समझोता होऊन संयुक्त प्रशासन स्थापन करण्यात आले होते. पण तेही फारकाळ टिकू शकले नाही. यापुढचा हानिया याचा काळ अनिश्चितता आणि अस्थैर्य यांनी भरलेला होता. 2016 मध्ये त्याने पॅलेस्टाईन सोडून कतार येथे आश्रय घेतला. आपले कार्यालय त्याने कतारची राजथानी दोहा येथे स्थापन केले. याच कार्यालयातून त्याने इस्रायलविरोधी कारवाया आत्तापर्यंत चालविल्या होत्या. आता त्याची हत्या झाल्यानंतर पुढे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचे काय होणार, यावर बरीच चर्चा होत आहे. सध्या इराण हमासला शस्त्र आणि पैसा पुरवित आहे. इस्रायलच्या उत्तरेला असणाऱ्या लेबेनॉनस्थित हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेलाही इराण अशाच प्रकारे समर्थन देत आहे. इराणच्या प्रमुख धार्मिक नेत्यांनी इस्रायलचा नायनाट करण्याची महत्वाकांक्षा अनेकदा जाहीररित्या बोलून दाखविल्याने इस्रायललाही स्वत:च्या अस्तित्वासाठी शस्त्रसज्ज आणि नेहमी युद्धाच्या स्थितीत रहावे लागते. हानिया याची हत्या इराणमध्ये झाल्याने या हत्येचा सूड घेण्यात येईल आणि इस्रायलशी थेट युद्ध पुकारण्यात येईल, अशी घोषणा इराणचे धार्मिक प्रमुख खमेनी यांनी केली आहे. ही धमकी इराणने खरी करुन दाखविली तर मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाच्या ज्वाळा भडकणार हे निश्चित आहे. युद्ध रोखण्यासाठी अमेरिका आणि मध्यपूर्वेत स्वारस्य असणाऱ्या इतर देशांनी प्रयत्नांना प्रारंभ केला आहेच. इराणचे जहालमतवादी अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा नुकताच विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे रहस्य उलगडण्याच्या आतच इस्माईल हानिया याचीही इराणमध्येच हत्या झाली आहे. कमी कालावधीत घडलेल्या या दोन घटना निव्वळ योगायोग नसून त्यांचा एकमेकींशी संबंधही असू शकतो, अशीही चर्चा आहे. पण या घटनांच्या मुळाशी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 7 ऑक्टोबरला केलेला अमानुष हल्ला हेच आहे, यासंबंधी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. याचाच अर्थ असा की ‘दहशतवाद’ हा कोणत्याही समस्येवर तोडगा असू शकत नाही. उलट दहशतवादाचा आधार घेतल्यास हाती काही लागत तर नाहीच पण हानी मात्र मोठ्या प्रमाणात होते हे सर्वच संबंधितांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article