For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएसआय एजंट आमिर हमजाची हत्या

06:41 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएसआय एजंट आमिर हमजाची हत्या
Advertisement

पाकिस्तानी लष्कराचा निवृत्त ब्रिगेडियर : गुप्त शुटर्सनी झाडल्या गोळ्या

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानस्थित आयएसआय एजंट आणि निवृत्त लष्करी ब्रिगेडियर आमिर हमजा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो आपल्या कुटुंबासह पंजाब राज्यातील झेलम जिह्यात कारमधून जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लिलाह इंटरचेंजजवळ त्यांच्या कारला घेराव घालत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात निवृत्त ब्रिगेडियर जागीच ठार झाला. या गोळीबारात त्याची पत्नी व मुलगी जखमी झाली आहेत. आमिर हमजा गतप्राण होताच शार्प शूटर्सनी घटनास्थळावरून पोबारा केला. पंजाब राज्य पोलिसांनी याला टार्गेट किलिंग म्हटले आहे.

Advertisement

भारताच्या आणखी एका शत्रूची पाकिस्तानच्या भूमीवर हत्या करण्यात आली. निवृत्त ब्रिगेडियर आमिर हमजा हा आयएसआयचा भयानक गुप्तहेर आणि भारताचा मोठा शत्रू होता. तो पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. तेथून तो सातत्याने भारतविरोधी कारवाया करत होता. त्याच्या हत्येमागे कोण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्याच्या हत्येचा पाकिस्तान सातत्याने तपास करत आहे.

अनेक हल्ल्यांचा सूत्रधार

आमिर हमजा हा पाकिस्तानी लष्कराचा भाग असला तरी तो मोठा दहशतवादी होता. जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तो भारताचा मोठा शत्रू होता. 10 फेब्रुवारी 2018 रोजी जम्मूतील सुंजवान पॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. त्याच्या निर्देशानुसार जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लष्करी छावणीमध्ये घुसले होते. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराला तीन दिवस लागले. या दहशतवादी हल्ल्यात आपल्या लष्कराचे सहा जवान हुतात्मा झाले. मौलाना आमिर हमजा हा 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या आरोपात मोस्ट वॉन्टेड होता. 2012 मध्ये अमेरिकेने या खतरनाक दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते.

Advertisement

.