काकती येथील कारखान्यात सहकारी कामगाराचा खून
बिहारी कामगाराचा उत्तरप्रदेशच्या कामगाराकडून घात
बेळगाव : काकती येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या बिहारी कामगाराचा खून झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून याच कारखान्यात काम करणाऱ्या आणखी एका कामगाराने हे कृत्य केल्याचा संशय आहे. त्याच्यावर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. मुकेशकुमार शंकर पांडे (वय 34) राहणार बिहार असे खून झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याच्यावर हल्ला झाला आहे. कारखाना परिसरातच मुकेशकुमार विव्हळत पडला होता. शेजाऱ्यांनी त्याला पाहून कारखाना मालकाला घटना कळवली. तातडीने त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.
कारखान्याचे संचालक मंजुनाथ लोगावी यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनी खासगी इस्पितळाला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चहाचे पेपर कप तयार करणाऱ्या कारखान्याच्या आवारात ही घटना घडली आहे. मुकेशकुमार हा दोन महिन्यांपूर्वी या कारखान्यात कामाला आला होता. पंधरा दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमधील पवनकुमारही कामाला आला. काम संपल्यानंतर कारखाना परिसरातील खोलीत हे दोघे रहात होते. मुकेशकुमारच्या डोक्यावर एखाद्या अवजाराने हल्ला करून पवनकुमार फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक झाल्यानंतरच या घटनेचे निश्चित कारण समजू शकणार आहे. पवनकुमारला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.