Karad Crime : बदनामीच्या भीतीने अल्पवयीन मुलीचा खून
समाजातील बदनामीच्या भीतीने हा खून केल्याची माहिती तपासात समोर
कराड : ऑगस्ट २०२४ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात पाटण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले. बेपत्ता मुलीचा खून झाल्याचा संशय बळावताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पाटण तालुक्यातील कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाचा गुन्हा अखेर आठ महिन्यांनी उघड झाला.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आणि तिला गर्भवती झाल्यानंतर गळा दाबून खून करून मृतदेह पुरून टाकणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोयनानगर पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीच्या गुन्हा दाखल होता. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस संशयित ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय ३७) याने ऑगस्ट २०२४ मध्ये आमिष दाखवून पळवून नेले होते. दरम्यान, तपासात संशयिताने या मुलीचा खून करून वाजेगाव परिसरातील खड्ड्यात पुरल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
संशयिताने नायब तहसीलदार, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह पुरल्याचे ठिकाण दाखवून दिले. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला व नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. खुनासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमासह अन्य कलमे लावण्यात आली असून त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. समाजातील बदनामीच्या भीतीने हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.