शेतजमिनीच्या वादातून ममदापूरमध्ये खून
मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्यावर कोयत्याने दहा वार
बेळगाव : गावातील मंदिरात सुरू असलेल्या भजन कार्यक्रमात भाग घेऊन नंतर मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या एका इसमाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून शेतजमिनीच्या सीमेच्या वादातून हा खून झाला आहे. मड्ड्याप्पा यल्लाप्पा बानसी (वय 47) रा. ममदापूर असे खून झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच गावातील बिराप्पा सुनदोळी या वृद्धाने हे कृत्य केले आहे. खुनाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी बिराप्पाला ताब्यात घेतले आहे. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार ममदापूर येथील बिरसिद्धेश्वर मंदिरात मंगळवारी रात्री भजनाचा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमात भाग घेऊन मड्ड्याप्पा थोडी विश्रांती घेण्यासाठी मंदिराच्या आवारातील कट्ट्यावर झोपला होता. लगेच बिराप्पाने कोयत्याने वार करून त्याचा खून केला आहे. घटनेची माहिती समजताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. खून झालेला मड्ड्याप्पा व आरोपी बिराप्पा यांच्यात शेतजमिनीच्या सीमेचा वाद होता. गेल्या दहा वर्षांपासून हा वाद सुरू होता. गावातील प्रमुखांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रयत्नांना यश आले नव्हते. बिराप्पाने मड्ड्याप्पाला संपवायचे ठरवून त्याचा पाठलाग केला. भजन आटोपून मंदिराच्या कट्ट्यावर तो झोपल्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मड्ड्याप्पाने आरडाओरड सुरू करताच मंदिरातील अनेक जण त्याला सोडवून घेण्यासाठी धावले. तोपर्यंत बिराप्पाने त्याच्यावर तब्बल दहावेळा हल्ला केला होता. गोकाक ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.