Sangli : तासगांवात मागील वादातून धुळगांवमध्ये खून; चार जण अटकेत
किराणा माल आणण्यासाठी सांगली जात असताना खून
तासगाव : मागील भांडणाचा राग मनात धरून तासगांव तालुक्यातील धुळगांव येथील एकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून नावे निष्पन्न असलेले तिघे व अनोळखी एक अशा चौघा विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली.
राजीव गौतम खाडे-३८ रा. धुळगांव ता. तासगांव है खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी त्यांचे वडिल गौतम शिवा खाडे रा.धुळगांव यांनी विशाल माणिक घेडे-२८, आयुष परशुराम कांबळे-२२, गिरीषकुमार गुंडा चंदनशिव-१९, सर्व रा.धुळगांव व अनोळखी एक यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. तर तपासात अनोळखीचे नाव निष्पन्न झाले असून त्याचे नाव आनंद प्रशांत लोखंडे १९ रा.सोनी, ता. मिरज असे आहे.
राजीव खाडे हे किराणा मालाचे दुकान सांभाळत होते, ते दुकानातील किराणा माल आणण्यासाठी सांगलीत जात होते. तर धुळगांव येथील विशाल बेंडे, त्याचे मित्र आयुष कांबळे, गिरीषकुमार चंदनशिवे यांचे सोबत राजीव याचा मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळी पुढे पुढे करण्यावरून वाद झाला होता.
त्यावेळी विशाल यांनी राजीव यांच्याकडे बघून, माझी वेळ येवू दे तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत होता. याकडे फिर्यादी व त्यांचे कुटुंबिय लक्ष देत नव्हते तर तो अधुन मधून राजीवकडे बघत जात होता. पण बुधवार २६ रोजी दुपारी फिर्यादी सांबरवाडीत येथे गंवडी काम पाहणेसाठी सायकलवरून जात होते. घोलाचा ओढ्याचे जवळ ते गेले असता त्यांना मुलगा राजीवची पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी रस्त्यावर पडलेली दिसली.
त्यावर दुकानचा माल होता. फिर्यादी राजीवची गाडी रस्त्याचे बाजुला का पडली म्हणून पाहणेसाठी चालत पुढे गेले त्यावेळी धुळगांव येथील विशाल धेंडे, आयुष कांबळे, गिरीष चंदनशिवे व त्यांचे सोबत आणखी एक हे सगळेजण फिर्यादी यांना बघून पळु लागले. त्यावेळी फिर्यादी यांना रोडचे कडेला गवतामध्ये विव्हळल्या सारखा आवाज आला म्हणून फिर्यादी यांनी तेथे जाऊन पाहिले असता राजीव जखमी अवस्थेत पडलेला होता, त्याचे डोक्यास जखम झाली होती.
फिर्यादी यांनी राजीवला तुला कोणी मारले असे विचारले. त्यावर त्याने मला विशाल धेंडे, आयुष कांबळे, गिरीष चंदनशिवे, व आणखी एक मुलगा या सगळ्यांनी एडका कुकरी, व लाकडी दांडक्याने मारल्याचे सांगितले. त्यांनी चारचाकी गाडीतून जखमी राजीवला दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.