For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : पुळकोटीतील वृद्धेच्या खुनाचा गुन्हा उघड, एकास अटक

04:46 PM Nov 07, 2025 IST | NEETA POTDAR
satara   पुळकोटीतील वृद्धेच्या खुनाचा गुन्हा उघड  एकास अटक
Advertisement

             पुळकोटीतील वृद्धेच्या खुनाचा २३ वर्षीय संशयित अटक

Advertisement

म्हसवड : माण तालुक्यातील पुळकोटी येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या वृद्धेच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात जयसिंह उर्फ करण आप्पासो लोखंडे वय २३ वर्षे रा.शिरताव, ता माण) यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या यश आले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.१२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पुळकोटी येथील सुलभा मारुती गलंडे वय ६५ वर्षे रा. पुळकोटी ता. माण या घरात एकट्या असताना अज्ञाताने त्यांचा खून करून पुरावे नष्ट केले होते. या घटनेबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून करणाऱ्याने पुरावे नष्ट करून तपासात गोंधळ निर्माण केला होता.

Advertisement

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत (दहिवडी विभाग) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पुळकोटी आणि परिसरात गुप्त बातमीदारांचे जाळे उभारून हालचालींवर सतत लक्ष ठेवले.

दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिरताव (ता. माण) येथील एक युवक गुन्हा घडल्यापासून बेपत्ता आहे. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सलग सहा तासांच्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

या तपासादरम्यान आरोपीच्या वापरातील हुडी जर्किंगवर “When granted everything, you can’t do anything” ही टॅगलाईन असलेली ओळख पटल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. या सुगावावरूनच गुन्हा उघडकीस येण्यास मदत झाली. या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फाणे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातिर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे, पोउनि अनिल वाघमोडे, दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे तसेच अनेक पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.

गुन्हा उघडकीस आणणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.