पालिकेचा ‘हरित सातारा’ उपक्रमात सहभाग
सातारा
सातारा नगरपालिकेच्या हद्दीत अजिंक्यतारा, मंगळाई मंदिर परिसर, भैरोबा पायथा, जेसीओ कॉलनी सदरबाजार, रस्त्याच्या कडेने आदी ठिकाणी सातारा नगरपालिकेने झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून यावषीं 10 हजार झाडे सातारा पालिकेच्यावतीने लावण्यात येणार आहेत. तसेच जे नागरिक स्वयंस्फुर्तीने झाडे लावणार आहेत त्यांच्यासाठी झाडे मोफत देण्याची योजना दि. 18 जूनपासून सातारा पालिकेच्या वृक्ष विभागाच्यावतीने सुरु करण्यात येणार आहे. सुमारे 10 हजार झाडे सातारा शहरात पालिका लावणार असून ही मोहिम सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे.
सातारा हरित शहर बनवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी निर्धार केलेला आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे यांनीही सातारा शहरातील वृक्षारोपणास अनुकुलता दर्शवली आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी अभिजित बापट हे नेहमीच पालिकेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार सातारा शहरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्याकरता त्यांनी सुमारे 10 हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सातारा शहरातील सर्व रस्त्याच्या कडेने, किल्ले अजिंक्यतारा परिसर, मंगळाई देवी परिसर, सदरबाजार परिसरात जेसीओ कॉलनी, भैरोबा पायथा परिसर येथे झाडे लावण्यात येणार आहेत. त्यास पालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे खोदून झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर जे सातारकर झाडे लावण्यास इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी फणस, वड, करंज, आवळा, चिंच या प्रकारची तीन फुट उंचीची झाडे मोफत लावण्यासाठी दिली जाणार आहेत. वृक्ष विभाग प्रत्यक्ष ती झाडे देण्याचा कार्यक्रम दि. 18 जून पासून सुरु करणार आहे. माझी वसुंधरा अभियान आणि माँ के नाम एक पेड या उपक्रमातंर्गत सातारा शहरात यापूर्वी झाडे लावली गेली आहेत. त्या झाडांचे संगोपनही सातारा पालिकेच्यावतीने सुरु आहे. तसेच दुभाजकातील जी खराब झालेली झाडे आहेत ती काढून त्या जागी नव्याने झाडे लावण्यात येणार आहेत. जर कोणी बांबूची मागणी केली तर त्यास बांबूचे झाड लागवडीकरता दिली जाणार आहे, असे वृक्ष विभाग प्रमुख द्विग्विजय गाढवे यांनी बोलताना सांगितले.
- सातारा होणार हिरवागार
सातारा शहरात सुमारे 10 हजार झाडे लावल्यानंतर ती झाडे चांगली आल्यानंतर सातारा शहर हिरवेगार होणार आहे. किल्ले अजिंक्यतारा, मंगळाई मंदिर यासह परिसर झाडांने फुलून दिसणार आहे. या वृक्षरोपणामागे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.