For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा स्थायी समित्यांची आज निवडणूक

12:18 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपा स्थायी समित्यांची आज निवडणूक
Advertisement

मनपाकडून तयारी पूर्ण

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक मंगळवार दि. 2 जुलै रोजी होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत अर्ज दाखल करून घेतल्यानंतर दुपारी 3 वाजता मतदान घेतले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केली आहे. प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने गेल्या आठ दिवसांपासून तयारी केली. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र महानगरपालिकेने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून सकाळी 9 वाजता या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

एकूण चार स्थायी समित्या असून प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 65 मतदार आहेत. 58 नगरसेवक, 2 खासदार, 4 आमदार, 1 विधान परिषद सदस्य असे मतदार आहेत. त्यानंतर त्या सात नगरसेवकांच्या मतदानानुसार एका नगरसेवकाला अध्यक्ष केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व आरोग्य स्थायी समिती, अर्थ व कर, लेखा स्थायी समिती अशा एकूण चार स्थायी समित्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना या निवडणुकीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे.

Advertisement

निवडणूक बिनविरोध?

महानगरपालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. 5-2 या  फॉर्म्युल्यानुसार बिनविरोध निवड केली जाणार आहे. एकूण चार स्थायी समित्यांमध्ये सत्ताधारी गटाचे पाच नगरसेवक प्रत्येक स्थायी समितीमध्ये राहणार आहेत. तर विरोधी गटाच्या दोन नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्ताधारी भाजप गटाकडून 5-2 फॉर्म्युल्यानुसार स्थायी समित्यांची निवड करण्याचा प्रस्ताव विरोधी गटाला देण्यात आला होता. विरोधी गटानेही बैठक घेऊन त्या फॉर्म्युल्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

मनपातील स्थायी समितींच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटामधील नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. सोमवारी महापौरांच्या कक्षामध्ये काही नगरसेवकांची बैठक झाली. अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपलाही मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत. अनेकजण इच्छुक असल्याने त्यांच्यासमोरही समस्या निर्माण झाली आहे. मागीलवेळी ज्यांना संधी देण्यात आली आहे, त्यांना यावेळी वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्येही धुसफुस सुरू असून नाराज असलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.