मेणसी गल्ली भंगीबोळाची मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी
भंगीबोळात गेट उभारणीला स्थानिकांचा विरोध
बेळगाव : कांदा मार्केट आणि मेणसी गल्ली दरम्यानच्या भंगीबोळात एकट्याने जागेवर मालकी सांगत गेट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, त्याला स्थानिकांनी विरोध केल्याने बुधवार दि. 22 रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधिताला जागेसंबंधीची कागदपत्रे महापालिकेत सादर करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कांदा मार्केट ते मेणसी गल्ली दरम्यान भंगीबोळ आहे. या भंगीबोळाचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून तेथील व्यापाऱ्यांकडून केला जातो. मात्र, तेथील एकट्याने सदर भंगीबोळातील जागेवर आपली मालकी सांगत गेट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे याला तेथील लोकांनी विरोध केला आहे. ही माहिती समजताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जागेसंबंधीची कागदपत्रे महापालिकेत हजर करावीत, कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर पुढील कार्यवाही होईपर्यंत गेट उभारण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते.