कन्नड संघटनांच्या दबावाखाली महापालिका कर्मचारी?
दुकानांवरील फलकांवर कारवाई करताना व्यापाऱ्यांना तंबी : मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव शहरातील कन्नड संघटनांचा उन्माद दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानांच्या फलकांवर कारवाई करण्यासाठी कन्नड संघटनेचा एक कार्यकर्ता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांना तंबी देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी कन्नड संघटनांच्या दबावाखाली काम करत आहेत का? असा प्रश्न शहरातील मराठी भाषिक उपस्थित करीत आहेत. शनिवारी पाटील गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचा फलक काढण्यासाठी कन्नड संघटनेची एक महिला आपल्या कार्यकर्त्यांसोबत आली होती. परंतु, गणेशोत्सव मंडळांच्या एकीमुळे पोलिसांनी त्या महिलेला वेळीच आवरले. ही घटना ताजी असतानाच आता उद्यमबाग येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेहमी मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकणारा कन्नड संघटनेचा एक कार्यकर्ता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत फलक हटवताना दिसत आहे.
उद्यमबाग परिसरात मराठी भाषिकांची सर्वाधिक दुकाने तसेच कारखाने असल्याने तेथे जाऊन फलक हटविण्यासाठी व्यापाऱ्यांना तंबी देण्यात आली. अधिकाऱ्यांचा आधार घेत कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी व्यापाऱ्यांना डिवचण्याचा प्रकार करीत आहेत. कारवाई अथवा सूचना करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आहे. मग त्या ठिकाणी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्याची लुडबूड का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ज्या भागात मराठी भाषिकांचे सर्वाधिक व्यवसाय आहेत, त्या भागावर कन्नड संघटनांचे लक्ष आहे. दुकानांच्या फलकावर कन्नड भाषेत उल्लेख असतानाही तो इतकाच असावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकाराला महानगरपालिका खतपाणी घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. भाषिक वाद उफाळून येण्यापूर्वी महानगरपालिकेने असे प्रकार थांबविण्याची मागणी केली जात आहे.