For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा कर्मचाऱ्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड

11:29 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपा कर्मचाऱ्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड
Advertisement

राज्य नगर सचिवांकडून झाडाझडती घेतल्यानंतर कामाला गती

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित असलेली विविध विकासकामे, करवसुली करणे तसेच साथीच्या आजाराबाबत काळजी घेण्याची सूचना राज्य नगर विकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केल्या होत्या. राज्यातील काही नगरविकास खात्याच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यानंतर बेळगावमधीलही महानगरपालिकेतील कर्मचारी कामाला लागले आहेत. प्रत्येक जण दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता तसेच लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये मनपाच्या कर्मचाऱ्यांना झुंपण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन महिने उलटले तरी हे कर्मचारी नियमित कामाकडे दुर्लक्ष करीत होते. राज्यातील सर्वच नगर पालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बुधवार दि. 31 रोजी नगरविकास सचिवांनी तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यामध्ये सर्वच महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामध्ये अनेक महानगरपालिकेची कामे अर्धवट असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा पारा चांगलाच चढला होता.

Advertisement

या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी तातडीने बैठका घेऊन साऱ्यांचीच झाडाझडती घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कामे प्रलंबित ठेवू नका अशी सक्त ताकीद त्यांनी देखील मनपाच्या कर्मचाऱ्यांना केली आहे. कामे कराच मात्र अहवालही तयार ठेवा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा बैठकींमध्ये दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सर्वच विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत. सायंकाळी 6 पर्यंत थांबून कामे पूर्ण करत आहेत. एकूणच कानपिचक्या दिल्याशिवाय कामामध्ये सुधारणा होत नसल्याचे यावरून दिसून येत असल्याची चर्चा सध्या महानगरपालिकेच्या परिसरात होत आहे.

Advertisement
Tags :

.