मनपाचे कामकाज सोमवारी राहणार सुरू
चौथ्या दिवशीदेखील आंदोलन सुरूच : राज्य कर्मचारी संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष
बेळगाव : विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन शुक्रवार दि. 11 रोजी चौथ्यादिवशीदेखील सुरूच होते. अद्यापही मागण्या मान्य न झाल्याने सदर आंदोलन मागे घ्यावे की सुरू ठेवण्यात यावे याबाबत मंगळवार दि. 15 रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे सोमवार दि. 14 रोजी नेहमीप्रमाणे बेळगाव मनपाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मलिक गुंडपण्णावर यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेली कामे सोमवारी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विविध मागण्यांसाठी बेळगाव मनपासह राज्यातील 11 महानगरपालिकांचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. पहिल्या दिवशी बेंगळूर येथील फ्रीडमपार्क मैदानावर आंदोलन करण्यात आले.
त्याचबरोबर विविध महानगरपालिकांचे कामकाज बंद ठेऊन ठिय्या आंदोलन केले जात आहे. बेळगाव मनपाचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून आंदोलन करत आहेत. दरम्यानच्या काळात विविध आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महापालिकेत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सरकारने अद्यापही मागण्यांची पूर्तता केली नसल्याने सदर बेमुदत आंदोलन मागे घ्यावे की सुरू ठेवावे याबाबत राज्य मनपा कर्मचारी संघटनेने अद्याप कोणताही निर्णय कळविलेला नाही. मंगळवारी पुढील रूपरेषा ठरविली जाणार आहे. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे मनपाचे कामकाज सुरू राहणार आहे. चार दिवसांपासून मनपाचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे तटलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.