मनपा टोचणार भटक्या कुत्र्यांना अँटीरेबिज लस
जागतिक अँटीरेबिज दिनाचे औचित्य : फिडिंग झोनचाही शोध
बेळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी फिडिंग झोन तयार केले जाणार आहेत. त्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी मनपा अधिकारी व प्राणीप्रेमींची बैठक आयोजित केली होती. 28 सप्टेंबर जागतिक अँटीरेबिज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी मनपाकडून 2800 भटक्या कुत्र्यांना अँटीरेबिज लस टोचली जाणार आहे. शहरात मनपाचे तीन विभाग आहेत. या तीन विभागात प्रत्येकी 2 फिडिंग झोन तयार करण्याचे नियोजन आहे. फिडिंग झोन तयार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
त्याची कार्यवाही करण्याचा आदेश नगर प्रशासन खात्याने राज्यातील सर्व महापालिकांना दिला आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार बैठकीत शहरात फिडिंग झोन सुरू करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. याची जबाबदारी प्राणीप्रेमी व आरोग्य विभागावर सोपविली आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यावर बंदी घातली आहे. स्थानिक प्रशासनाने स्वतंत्र फिडिंग झोन तयार करावेत, असा आदेश बजावला आहे.
त्यामुळे भटक्या कुत्र्यांना एका विशिष्ट ठिकाणी खायला घातले जाईल. कुत्र्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी होईल, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. लवकरच फिडिंग झोन निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे महापालिकेने 28 सप्टेंबर जागतिक अँटीरेबिज दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी असलेल्या 2800 भटक्या कुत्र्यांना अँटीरेबिज लस टोचण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पशुसंगोपन खात्याची मदत घेतली जाणार आहे. गुरुवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अधिकारी व प्राणीप्रेमींची बैठक घेऊन चर्चा केली आहे.