तीन ठिकाणाहून चोरी गेलेले बाक मिळविण्यात मनपाला यश
बेळगाव : स्टेशन रोड, शिवचरित्र आणि शहापूर येथून चोरण्यात आलेल्या तीन बाकांचा शोध घेण्यात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना यश आले आहे. कपिलेश्वर तलावाच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत नागरिक उघड्यावर लघुशंका करत होते. त्यामुळे हा प्रकार थांबावा यासाठी तेथील काही युवकांनी महापालिकेला याची कल्पना देण्यापूर्वीच तेथील बाक उचलून नेले होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाक चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. सुरुवातीला टेंगिनकेरा गल्लीच्या क्रॉसवरील होळी कामण्णा मंदिरासमोरील बाकाची चोरी झाली होती. त्यानंतर स्टेशनरोड, शिवचरित्र आणि शहापुरातून एकूण तीन बाकांची चोरी झाल्याने ही बाब महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आनंद पिंपरे यांनी गांभीर्याने घेतली. स्टेशन रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता रात्रीच्यावेळी काही तरुणांनी मालवाहू वाहनातून तेथील बाक नेल्याचे दिसून आले. त्यानुसार चौकशी केली असता कपिलेश्वर तलावाच्या पाठीमागे असलेल्या गल्लीतील युवकांनी तीन बाक उचलून नेल्याचे समोर आले. तेथील गल्लीत काहीजण उघड्यावरच लघुशंका करत होते. त्यामुळे हा प्रकार थांबावा यासाठी आपण सदर बाक नेल्याचे युवकांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित युवकांना याबाबत समज देण्यात आली आहे.